Thursday, August 27, 2026

OBC certificate : सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र

OBC certificate : सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे

मुंबई : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील जवळपास सर्वच बड्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी हे दावे फेटाळत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच नव्हे, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ओबीसीचे प्रमाणपत्र काढून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील अनेक प्रमुख मराठा नेत्यांकडे अशी प्रमाणपत्रे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे असे प्रमाणपत्र आहे किंवा नाही, याबाबत आपल्याला नक्की माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याकडे जन्माचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पदवीचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि बारामतीचे खासदार म्हणून वैध कागदपत्रे असल्याचे सांगत त्यांनी, "माझ्याकडे कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही, हे मी खात्रीने सांगते," असे स्पष्ट केले. रोज उठून काँग्रेसकडून आपल्यावर अशा प्रकारची विनाकारण टीका का केली जाते, याचे नवल वाटते, असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >