- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीमागील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी चक्क एमपीएससीचा पेपर फोडल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या गंभीर प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या अहवालाच्या आधारे आयोगाने ही संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो होतकरू उमेदवारांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते ...
आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट-ब संवर्गासाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यभरात चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर पोलीस तपासात या पेपरफुटीमागे एक प्रेमकहाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित तरुणाने एमपीएससीमधील एका निम्न स्तरावरील कर्मचाऱ्याला हाताशी धरून हा पेपर मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, फुटलेला हा प्रश्नपत्रिका संच केवळ एकाच व्यक्तीपर्यंत पोहोचला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्यामुळे आयोगाने संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विद्यमान अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती. या निर्णयामुळे आता संबंधित पदासाठी नव्याने फेरपरीक्षा घेतली जाणार असली, तरी एकाच्या चुकीचा फटका हजारो प्रामाणिक उमेदवारांना बसल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.