Tuesday, August 25, 2026

Ahilyanagar : सोन्याचे गंठण, चांदीचे सिंहासन लंपास, शेंडीतील मळगंगा देवी मंदिरात चोरी

Ahilyanagar : सोन्याचे गंठण, चांदीचे सिंहासन लंपास, शेंडीतील मळगंगा देवी मंदिरात चोरी

Ahilyanagar : शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील मळगंगा देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि देवीच्या पाठीमागे बसविण्यात आलेले चांदीचे सिंहासन चोरून नेले. या चोरीत एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (24 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश अरुण कराळे (वय 31, रा. शेंडी) यांनी फिर्याद दिली आहे. कराळे हे दररोज पहाटे मळगंगा देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. रविवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी 7 ते सोमवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरट्याने मंदिरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय आहे. (Ahilyanagar Crime News)

नेमकं काय घडलं ?

सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या प्रकाश अरुण कराळे यांना देवीच्या पाठीमागील चांदीचे सिंहासन आणि देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ मित्र महेश भगत यांना मंदिरात बोलावून परिसरात तसेच आजूबाजूला ऐवजाचा शोध घेतला. मात्र, चोरीस गेलेल्या वस्तूंचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक व्यक्ती मंदिरातील ऐवज चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कराळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. (Ahilyanagar Crime News)

सोन्याचे गंठण, चांदीचे सिंहासन लंपास

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 45 भार वजनाचे चांदीचे सिंहासन आणि एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण असून, त्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >