Nashik Kumbh Mela : महासिंहस्थाच्या आधी नाशिकमध्ये भक्ती, संगीत आणि भारतीय संतपरंपरेचा अनोखा ‘सांस्कृतिक कुंभ’ अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची कीर्तन परंपरा, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन परंपरा आणि मणिपूरचे वैशिष्ट्यपूर्ण नट संकीर्तन अशा देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा संगम ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवातून साधला जाणार आहे. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे होणाऱ्या या महोत्सवात विविध प्रदेश, परंपरा आणि कलाप्रकार एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित या महोत्सवाची संकल्पना केवळ विविध कलाकारांना एकत्र आणण्यापुरती मर्यादित नाही. कुंभाच्या मूळ भावनेतील विविध भक्तिपरंपरांचा संगम सांस्कृतिक पातळीवर घडविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. देशभरातील भक्ती, भजन आणि कीर्तनाच्या विविध परंपरांना एकाच व्यासपीठावर आणून त्यातील वैविध्य आणि त्यांना जोडणारा भक्तीचा समान धागा अधोरेखित केला जाणार आहे. (Nashik Kumbh Mela)
कोलकत्ता : भारतीय फुटबॉल वर्तुळातून एक अतिशय रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ड्युरँड कप ...
महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत भक्तीचा प्रवास
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने भक्तिरसाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर श्री. राहुल देशपांडे यांच्या अभंगवारीचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनासोबत कु. मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र ‘भक्ती संगम’ची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. तिसऱ्या दिवशी भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी – श्री दरबार साहिब, अमृतसर यांच्या गुरबाणी शबद कीर्तन परंपरेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे पारंपरिक सादरीकरण होईल. महाराष्ट्रातील कीर्तन आणि अभंगवारी, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन परंपरा आणि मणिपूरचे नट संकीर्तन हे शैली, भाषा आणि सादरीकरणाच्या दृष्टीने वेगवेगळे असले, तरी भक्तीच्या समान भावनेने जोडलेले आहेत. ही विविधता एका मंचावर अनुभवता येणे हेच ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’चे वैशिष्ट्य ठरणार आहे.
‘भक्ती संगम’मधील ‘संगम’ ही संकल्पना केवळ नद्यांच्या संगमापुरती मर्यादित नाही. विविध संतपरंपरा, भक्तिपरंपरा, कलाकार, प्रदेश आणि रसिक यांचा सांस्कृतिक संगम घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. महासिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना भारतीय भक्तिपरंपरेतील ही विविधता अनुभवता यावी, हा या उपक्रमाचा व्यापक हेतू आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता सिंहस्थाच्या सांस्कृतिक अनुभवाची झलक देणारा उपक्रम ठरणार आहे. (Nashik Kumbh Mela)
Ahilyanagar : देशभरात श्रावण महिन्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे.अनेक ठिकाणी श्रवणानिमित्त उत्सव आणि ...
भक्तीच्या सादरीकरणासोबत विचारमंथनही
‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’मध्ये केवळ भक्तिसंगीत आणि कलाविष्कार नाही, तर २९ ऑगस्ट रोजी ‘भक्ती संमेलन’च्या माध्यमातून भारतीय संतपरंपरेवर विचारमंथन करण्यात येणार आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या संमेलनात महासिंहस्थ कुंभमेळा, भारतीय संत आणि समरसता तसेच राष्ट्रीय दृष्टिकोनातून संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय या विषयांवर चर्चा होणार आहे.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून, ह.भ.प. श्री. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे, श्री. ष. ब्र. प्र. डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, श्री. महंत श्रीमानस शास्त्री, श्री. सुदर्शन महाराज कपाटे, ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे आणि ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, ह.भ.प. डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, श्री. जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज वीर, श्री. मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य प. पू. महंत श्री. चिरडे बाबा सहभागी होणार आहेत. (Nashik Kumbh Mela)
मुंबई : वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या ...
महासिंहस्थाच्या सांस्कृतिक तयारीची सुरुवात
महासिंहस्थ २०२७च्या तयारीत रस्ते, वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांच्या सुविधांसोबतच नाशिकची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचविण्यावरही भर दिला जात आहे. ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा त्याच व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे. देशाच्या विविध भागांतील संतपरंपरा आणि भक्तिकला नाशिकमध्ये एकत्र आणून महासिंहस्थाच्या सांस्कृतिक वातावरणाची अनुभूती आधीपासूनच निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम, नाशिक येथे होणारा हा महोत्सव म्हणजे विविध परंपरा आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवत एकत्र येण्याचा अनुभव ठरणार आहे.



