व्हिडिओ शेअर करत भाजपकडून जोरदार हल्लाबोल
𝐄𝐯𝐞𝐧 𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐡𝐚𝐬 𝐭𝐨 𝐛𝐞 𝐛𝐨𝐮𝐠𝐡𝐭 𝐟𝐨𝐫 𝐑𝐚𝐡𝐮𝐥 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢. ⚠️
Look at this video. Influencers are being offered ₹25,000 just to attend his Pune event. Rahul Gandhi’s leadership is so weak that even event attendance needs to be paid for.… pic.twitter.com/tCgnb6UmSg
— BJP (@BJP4India) August 21, 2026
भाजपने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि काँग्रेस कार्यकर्त्यामधील कथित संभाषण ऐकायला मिळत आहे. या संभाषणात 'शांतनू' नावाचा व्यक्ती संबंधित इन्फ्लुएन्सरला २२ तारखेच्या पुण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी २५,००० रुपये आणि प्रवासाचा खर्च देण्याचे आश्वासन देत आहे. या व्हिडिओचा दाखला देत भाजपने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपने लिहिले की, "बघा हा व्हिडिओ, राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमाला फक्त हजेरी लावण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५-२५ हजार रुपये ऑफर केले जात आहेत. राहुल गांधींचे नेतृत्व इतके कमकुवत झाले आहे की आता त्यांना कार्यक्रमासाठी गर्दीसुद्धा विकत घ्यावी लागत आहे. असे असूनही ते पराभव झाल्यावर ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करतात."
'छात्रों की गूंज' कार्यक्रम आणि पोलिसांच्या कडक अटी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा 'छात्रों की गूंज' हा विद्यार्थी संवाद कार्यक्रम पुण्याच्या एसएसपीएमएस (SSPMS) कॉलेजच्या मैदानावर पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रामुख्याने तरुणी आणि महिलांशी संवाद साधला जाणार असून, तब्बल ८ ते १० हजार लोक जमण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी कडक नियमावली आणि अटी लागू केल्या आहेत :
कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक फोटो, बॅनर किंवा पोस्टर्स लावण्यास पूर्ण मनाई आहे.
कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी आयोजकांची असेल.
सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरे आणि आकाशात सोडल्या जाणाऱ्या हाय-इंटेन्सिटी बीम लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
महिलांच्या तपासणीसाठी महिला सुरक्षारक्षक आणि स्वतंत्र प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकारक असून जवळील रुग्णालय, शाळा आणि रेल्वे स्टेशन परिसराला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. अटींचे उल्लंघन झाल्यास पोलीस परवानगी रद्द करतील आणि आयोजकांवर कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही पुणे पोलिसांनी दिला आहे.