नाशिक : मालेगाव परिसरात नशेच्या गोळ्या व औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपींवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या छाप्यात नशेच्या औषधांसह एकूण ६ लाख ३५ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मालेगाव शहरातील काली मैदान परिसरात करण्यात आली.
नाशिक ग्रामीण पोलीस घटकातील मालेगाव
मालेगावातील नाशिक ग्रामीण पोलीस परिमंडळातील पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या सूचनेनुसार नशेच्या पदार्थांविरोधातील कारवाई सुरु आहे. अपर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील काली मैदान परिसरात नशेच्या औषधांची विक्री होत असल्याचे समोर आले.
अहवालानुसार, पोलिसांनी पथक तयार करून २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून २१ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजेपर्यंत संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व औषधे जप्त केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज खान लुकमान खान, वय २५ वर्षे, याच्यासह इतर आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात सुरत, गुजरात येथेही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमका किती मुद्देमाल जप्त केला?
छाप्यात पोलिसांनी ट्रायटोलिडिन हायड्रोक्लोराइड अँड कोडीन फॉस्फेट कफ लिंकटस असलेल्या १० बॉक्समधील १२० बाटल्या जप्त केल्या. तसेच ALPRAZOLAM Tablets I.P. 0.5 mg असलेल्या ११२ पाकिटांमधील एकूण ४,४८० स्ट्रिप्स आणि त्यामधील ६७,२०० गोळ्या जप्त करण्यात आल्या.
याशिवाय GJ 19 X 0490 क्रमांकाचे टाटा एस वाहन, आरोपींचे तीन मोबाईल फोन आणि एक फळे-भाजीपाला वाहतूक करणारे कॅरेट असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६,३५,८७९ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील चार आरोपींची नावे फिरोज खान लुकमान खान, इर्शाद खान इस्माईल खान, वाहिद हसन सिद्दीकी हसन आणि शादाब अशी आहेत.
ही कारवाई मालेगावातील अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. नशेच्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






