Wednesday, August 19, 2026

Nashik Crime : मोबाईलमध्ये शूटिंगचा वाद विकोपाला ! तरुणाला संपवलं ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik Crime : मोबाईलमध्ये शूटिंगचा वाद विकोपाला ! तरुणाला संपवलं ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आता चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलमध्ये शूटिंग केल्याच्या जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गच्चीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही थरारक घटना विल्होळी येथील कोळीवाडा, गायकवाड गल्ली परिसरात घडली. राहुल संजय सरकटे असे मृताचे नाव असून या प्रकरणी तिघांना तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime News)

नेमकं काय घडलं ?

शांताराम गाडेकर यांनी दीपक पारधी आणि ज्योती बोंबले यांच्यातील संभाषणाचे मोबाइलवर रविवारी चित्रीकरण केले होते. याच कारणावरून दीपक पारधी याचा गाडेकर याच्यासोबत याच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर गाडेकर यांना मारहाण करण्यासाठी दीपकने अजय रामदास गांगुर्डे (रा. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) आणि वैभव गोविंद मेंगाळ (दत्तनगर, अंबड) यांना विल्होळी येथे बोलावल्याची माहिती आहे. सोमवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास शांताराम गाडेकर, रमेश खरे आणि राहुल सरकटे हे पिकअप वाहनातून जात असताना संशयितांनी मच्छी मार्केटजवळ त्यांची गाडी अडवली. (Nashik Crime News)

'तू मध्ये आला, आधी तुलाच मारतो'

संशयितांनी गाडी अडवल्यावर मारहान होईल या भीतीने तिघेही गाडेकर यांच्या दुमजली घराच्या गच्चीवर पळाले. त्यानंतर संशयित वैभव मेंगाळ आणि अजय गांगुर्डे यांनी शिवीगाळ करीत त्यांचा पाठलाग केला. गच्चीवर पोहोचल्यानंतर संशयित अजय गांगुर्डे याने 'तू मध्ये आला, आधी तुलाच मारतो', असे म्हणत राहुल सरकटे यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील राहुलला संशयित वैभव मेंगाळ याने दुमजली गच्चीवरुन खाली सिमेंटच्या रस्त्यावर ढकलून दिले. त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राहुलचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर गांगुर्डे, मेंगाळ हे घटनास्थळावरुन पसार झाले. (Nashik Crime News)

पाच तासांत तिन्ही संशयित ताब्यात

जखमी राहुलला नातेवाइकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत राहुलचा मोठा भाऊ अनिल संजय सरकटे (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime News)

पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपअधीक्षक विमला एम. व उपविभागीय अधिकारी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शीतल गायकवाड, निलेश मराठे, दत्तात्रय वाजे तसेच पोलीस शिपाई मंगेश पानझाडे, योगेश पाटील, अरुण रेहरे व हरी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >