Tuesday, August 18, 2026

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उपस्थित होत आहे. गुन्हेगारांमध्ये, हुल्लडबाजांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी नाशिक पोलिसांकडून 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे वदवून घेण्यात येत होते मात्र गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान देण्याची खुमखुमी कायम असल्याचे पुन्हा समोर आले आहे. नाशिकरोड परिसरात वर्चस्ववादाच्या लढाईत सराईत गुन्हेगारांकडून एका ३२ वर्षीय युवकावर गोळीबार करण्यात आला होता. उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दहा हून अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Nashik Crime News)

नेमकं काय घडलं ?

सुमित पगारे यांच्या हत्येप्रकरणी सुमित भाटिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे ते मित्र सुमित पगारे (३२, रा. पगारे चाळ) सायंकाळी उभा होता. त्यावेळी आरोपींनी तेथे येऊन जुना वाद उकरून काढला. मागील वादाच्या कारणावरून संशयितांनी तिघांच्या अंगावर धाव घेत शिवीगाळ केली. संशयित राजिक शेख याने सुमित पगारे यांना ‘आपल्यातील वाद मिटवून टाकू,’असे सांगत हातात हात मिळविण्याचा बहाणा केला. त्याचवेळी त्याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून सुमित पगारे यांच्या पोटावर दोन गोळ्या झाडल्या, असे फिर्यादीत नमूद आहे. (Nashik Crime News)

उपचारादरम्यान सुमितचा मृत्यू

गोळ्या थेट पोटात शिरल्याने सुमित गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सुमीतला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे नाशिकरोडमध्ये वाढलेली गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला.(Nashik Crime News)

दहा संशयित गजाआड, चार फरार

पोलिसांनी या प्रकरणात मनोज ऊर्फ मन्ना भारत गांगुर्डे (वय ४०, रा. जेलरोड), शाहिद शौकत शेख (२१, गोसावीवाडी), अर्जुन सुरेश पिवाल (३८, रा. वसंत विहार), अमोल उत्तम वाघ (४१, जेलरोड), पराग मिलिंद कुलकर्णी (२४, वसंत विहार), आशिष सुरेश पिवाल (२८, वसंत विहार), अक्षद ऊर्फ सोनू शरद गोसावी (२१, भालेराव मळा), आयुष पृथ्वीराज भारती (२१, कल्याण वेस्ट), साद आसिफ पठाण (२१, वडाळा गाव) आणि एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे तर शिवा पिवाल, राहुल सोनवणे, राजिक शेख आणि निशांत भारती हे चार संशयित फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा