Saturday, August 15, 2026

BMC News : सर्वेतील सुमारे ४ हजार फेरीवाले ठरले मयत

BMC News : सर्वेतील सुमारे ४ हजार फेरीवाले ठरले मयत

- तब्बल ३७ हजार ७८८ फेरीवाले संपर्क क्षेत्राच्या बाहेर

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या मुंबईतील ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांपैंकी आतापर्यंत ५७ हजार ६९७ पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित संख्या विचारात घेता, पडताळणीमध्ये ३ हजार ९५० अर्जदार हे मयत असल्याचे आढळले आहे. तर ३७ हजार ७८८ जण हे एकतर संपर्क होवूनही कार्यालयांमध्ये आलेले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. मात्र, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या वाढीव मुदतीत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण प्रक्रिया सुरु राहील. यानंतर येणाऱ्या कोणत्याही फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण केले जाणार नाही. (BMC News)

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात शुक्रवार १४ ऑगस्ट २०२६ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (BMC News)

पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते यांनी संगणकीय सादरीकरणासह दिली. पथविक्रेता समित्यांवरील अशासकीय सदस्यत्वासाठी अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना संवर्गातून १०७, निवासी कल्याण संघ संवर्गातून २७ आणि व्यापारी संघांचे प्रतिनिधी संवर्गातून १९ असे एकूण १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले. (BMC News)

शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >