पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रिक्षा भाडे, रुग्णवाहिका शुल्क, ई-रिक्षा, शेअर रिक्षा तसेच वाहन परवान्यांबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ऑटो रिक्षांचे भाडे 1 सप्टेंबरपासून वाढणार आहे. यापुढे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपये आकारले जाणार आहेत. नवीन भाड्यानुसार मीटरमध्ये बदल करण्यासाठी रिक्षाचालकांना 28 फेब्रुवारी 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या रुंदीकरण कामाची मंगळवारी सकाळी पाहणी ...
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून शेअर रिक्षा सेवा सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 28 मेट्रो स्थानके आणि 2 रेल्वे स्थानकांसह एकूण 30 ठिकाणी ही सेवा उपलब्ध होणार आहे.
रुग्णवाहिकांच्या शुल्काबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. मारुती व्हॅन, ईको, बोलेरो आणि आयसीयू टेम्पो ट्रॅव्हलर अशा विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांसाठी अंतर आणि वेळेनुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. ठरलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवर 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत दंडाची कारवाई केली जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तसेच महामार्ग वगळता इतर भागांत तीनचाकी, 4 आसनी ई-रिक्षांच्या नोंदणीला परवानगी देण्यात आली आहे. या ई-रिक्षांना डिजिटल मीटर, चारित्र्य पडताळणी अहवाल आणि पिवळा-काळा रंग असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, इरादापत्रांची मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे काही रिक्षा स्टँड हटवून त्यांचे स्थलांतर करण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी नव्या रिक्षा थांब्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.