Sunday, August 9, 2026

US-Iran : अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही; इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची

US-Iran : अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही; इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची

तेहरान : इराण सध्या अमेरिकेशी थेट वाटाघाटी करत नसून, दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे, अशी स्पष्ट माहिती इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी रविवारी दिली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमध्ये पुन्हा वाटाघाटी सुरू करण्यासाठी अनेक देश अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

"आम्ही सध्या अमेरिकेशी वाटाघाटी करत नाही; मध्यस्थांच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण होत आहे," असे अराघची यांनी स्पष्ट केले. तसेच, जूनमध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या १४ कलमी सामंजस्य कराराचे (इस्लामाबाद करार) अमेरिका जोपर्यंत उल्लंघन थांबवत नाही आणि नुकसानभरपाई करत नाही, तोपर्यंत तेहरान अमेरिकेशी थेट चर्चेत सहभागी होणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.

होरमुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याबाबत ओमानसोबतचा करार अंतिम टप्प्यात आला आहे, असेही अराघची यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, हा सामरिक जलमार्ग पुन्हा खुला करणे अमेरिकेकडून झालेल्या कराराच्या उल्लंघनाबद्दलच्या नुकसानभरपाईसह इतर अटींच्या अधीन असेल. जुनी वाहतूक विभागणी योजना आता इराणला मान्य नसून, एक नवीन मार्ग स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ओमान आणि इराणमधील चर्चेत चांगली प्रगती झाली असून, यामुळे लवकरच होरमुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होऊन विस्कळीत झालेला तेल निर्यात व्यापार पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा एका अमेरिकन अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. एकदा का व्यावसायिक नौकानयन सुरळीत झाल्याची घोषणा झाली की, युनायटेड स्टेट्स इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवईल, असेही त्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >