Saturday, August 8, 2026

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन करून 'माझं दुसरीकडं हाय सुरू' या गाण्यावर रील केल्याप्रकरणी पनवेल एसटी आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक नंदा कोळी तसेच वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. चूक केल्याची जाणीव व्हावी या हेतूनेच निलंबन केले होते, त्यामुळे राज्य परिवहन विभागाने फक्त तीन दिवसांच्या निलंबंनानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेतले. सेवेत पुन्हा घेतल्यानंतर नंदा कोळी यांनी साध्या कपड्यांमध्ये एक व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ पण व्हायरल होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा एसटी महामंडळ आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची रील्स हा विषय चर्चेत आला आहे.

पनवेल एसटी आगारात कार्यरत तीन कर्मचाऱ्यांनी मिळून केलेले 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावरील रील वेगाने व्हायरल होऊ लागले. एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना किंवा कर्तव्यावर असताना सोशल मीडियावर रील तयार करणे, व्हिडिओ शूटिंग करणे अथवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही या कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला होता. हा व्हिडीओ बघून एसटी महामंडळाने नियमानुसार कारवाई केली. रीलमध्ये दिसलेल्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पण तीन दिवसांनंतर राज्य परिवहन विभागाने निलंबित कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतले. निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे तिन्ही कर्मचारी आदेशानुसार कामावर रुजू झाले.

निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर काही काळाने घरातल्या कपड्यांवरच महिला कर्मचारी नंदा कोळी यांनी एक नवा व्हिडीओ केला. "शिव परिवहन कामगार संघटनेची पनवेल येथे मी अध्यक्षा आहे. माझ्या रीलचा व्हिडीओ महाराष्ट्रभर फिरला. कुणी कशाही कमेंट केल्या. प्रशासनाने आम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावून २ दिवस निलंबित केले होते. परंतु प्रशासनाने आमचे निलंबन मागे घेतले आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ फिरवून महाराष्ट्रात आमची बदनामी केली गेली. आमची विनंती असेल की व्हिडीओबद्दलची चर्चा थांबवा, आमचे निलंबन झाले होते, ते आता मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे माझे दोन सहकारी आणि मी देखील कामावर आहे", असे रीलमध्ये नंदा कोळी म्हणाल्या. "आम्ही व्हिडीओ बनवला, त्यात चुकीचे काहीच नव्हते. गाण्याच्या बोलावर केवळ आम्ही अभिनय केला, एवढेच खरे. आपल्या विभागात सगळेच व्हिडीओ बनवत होते, त्यामुळे आम्हीही व्हिडीओ बनवला. खाकी वर्दीवर व्हिडीओ बनवायचे नाही, हा नियम आम्हाला सांगितला गेला, शासनाने परिपत्रक काढले, तेव्हापासून आम्ही वर्दीवर व्हिडीओ बनवत नाही. त्यामुळे कृपा करून आता आमचा व्हिडीओ व्हायरल करू नका, आमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू नका. चुकीच्या पद्धतीने आम्हाला प्रसिद्ध करू नका", अशी विनंती नंदा कोळी यांनी केली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >