Thursday, August 6, 2026

Prashant Kishor met Sunetra and Parth Pawar : प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा आणि पार्थ पवारांची भेट; 'देवगिरी'वर बंददाराआड चर्चा

Prashant Kishor met Sunetra and Parth Pawar : प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा आणि पार्थ पवारांची भेट; 'देवगिरी'वर बंददाराआड चर्चा

राष्ट्रवादीच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्तीच्या चर्चांना उधाण

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत गटबाजी सुरू असतानाच, देशातील प्रमुख राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची मुंबईत भेट घेतली. मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी या तिघांमध्ये बंद दाराआड बैठक पार पडली. 'डिझाईन बॉक्स' कंपनीशी कंत्राट रद्द केल्यानंतर पक्षाची जनमानसातील प्रतिमा सावरण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची व्यूहरचना आखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांची नवे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची जोरदार चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील काळातील रणनीती, राज्यव्यापी जनमत सर्वेक्षण आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नुकताच पार पडलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिनाचा कार्यक्रमही प्रशांत किशोर यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी मुंबईत सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले असले तरी सल्लागारपदाच्या चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र, आता पुन्हा झालेल्या भेटीमुळे नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेतील नियुक्तीवरून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान देत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली अध्यक्षपदाची निवड पक्षघटनेनुसार झाली नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. दुसरीकडे, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी सुनेत्रा पवार यांचा संवाद कमी झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल यांच्या 'कार्याध्यक्ष' आणि तटकरे यांच्या 'प्रदेशाध्यक्ष' पदाचा उल्लेख टाळण्यात आल्याने हे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जाते. अशा अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची घसरलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पवार कुटुंबाने प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा मार्ग निवडल्याचे दिसत आहे.

'डिझाईन बॉक्स'शी करारमोड

  • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत 'डिझाईन बॉक्स' कंपनीच्या नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादीचे रणनीतीकार म्हणून काम पाहिले होते आणि पक्षाच्या बहुचर्चित 'गुलाबी थीम'ची संकल्पना त्यांनीच मांडली होती. मात्र, निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते आणि अरोरा यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. जानेवारी २०२६ मध्ये अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर मार्च २०२६ मध्ये पक्षाने 'डिझाईन बॉक्स'चे कंत्राट रद्द केले. त्यामुळे आता ही धुरा सांभाळण्यासाठी प्रशांत किशोर यांचे नाव पुढे आले आहे.
  • दरम्यान, प्रशांत किशोर यांनी देशातील अनेक प्रमुख नेत्यांच्या विजयात रणनीतीकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाकडून स्वतः निवडणूक लढवत त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात १९ हजार ३२४ मतांनी विजय मिळवून प्रत्यक्ष राजकारणातही आपला प्रभाव सिद्ध केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >