Thursday, July 30, 2026

Ramayana Trailer Adinath Kothare : ‘रामायण’च्या भव्य ट्रेलरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री! रणबीर-साई पल्लवीसोबत आदिनाथ कोठारे साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

Ramayana Trailer Adinath Kothare : ‘रामायण’च्या भव्य ट्रेलरमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री! रणबीर-साई पल्लवीसोबत आदिनाथ कोठारे साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा (Ramayana Trailer) दमदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि पौराणिक कथानकामुळे या चित्रपटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ट्रेलरमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहेत. रणबीरचा तेजस्वी लूक आणि साई पल्लवीचा साधेपणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यासोबतच रावणाच्या भूमिकेतील कलाकाराची झलकही लक्ष वेधून घेत आहे. मात्र या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही आपली खास छाप सोडली आहे. ट्रेलरमध्ये दिसलेला हा चेहरा म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे. (Adinath Kothare)

आदिनाथ कोठारे साकारणार ‘भरत’ची भूमिका :

सुमारे ४ हजार कोटींच्या बजेटचा असल्याची चर्चा असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तो प्रभू श्रीरामांचे बंधू भरत यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये श्रीराम आणि भरत यांच्या भेटीचा भावनिक प्रसंग दाखवण्यात आला आहे. याच दृश्यात आदिनाथ कोठारेची झलक पाहायला मिळते. मराठमोळ्या अभिनेत्याला एवढ्या मोठ्या पौराणिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाल्याने मराठी प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Adinath Kothare)

आदिनाथ कोठारेचा हिंदी सिनेसृष्टीतील ठसा :

आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील एक लोकप्रिय नाव आहे. मात्र त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. आदिनाथ ‘८३’ या हिंदी चित्रपटात माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय ‘शास्त्री विरुद्ध शास्त्री’ चित्रपटातही त्याने भूमिका साकारली आहे. ओटीटी विश्वातही आदिनाथने आपली छाप पाडली आहे. ‘क्रिमिनल जस्टिस : अधूरा सच’ मध्ये इन्स्पेक्टर प्रशांत वाघमारे, तर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मध्ये महेश आरावळे या भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Adinath Kothare)

आता ‘रामायण’मधील भरताच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे कसा प्रभाव पाडतो, याकडे मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या भव्य चित्रपटामुळे भारतीय सिनेसृष्टीत पुन्हा एकदा रामायणाच्या कथेला मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. (Adinath Kothare)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >