कवितेतील मनभावन पाऊस

स्मृतीगंध-लता गुठे

पावसाचं आणि माणसाचं नातं हे आदी काळापासून चालत आलेलं आहे. जेव्हापासून शेतीचा शोध लागला आणि माणूस शेती करू लागला, तेव्हापासून पाऊस त्याला हवाहवासा वाटू लागला. पावसाची अनेक रूपं त्याने डोळ्यांनी टिपली आणि मनात रुजवली. एकही कवी असा नसेल की ज्याने पावसावर कविता लिहिली नाही. या लेखातून प्रत्येक कवीच्या कवितेतील पाऊस कसा आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वयामध्ये मला भेटणारा पाऊस हा वेगळा आहे.



मला  पाऊस  प्रचंड आवडतो कारण माझा जन्म पावसाळ्यात झाल्यामुळे माझी आणि पावसाची मैत्री माझ्या जन्मापासूनची आहे हे मात्र नक्की.
पाऊस  आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते... त्याचा थंडगार स्पर्श मनाला सुखावून जातो. मातीचा मृदगंध आला की मनाच्या सागरात शब्द उसळ्या मारू लागतात आणि तो पहिला पाऊस अनेक आठवणी जाग्या करतो. शाळेच्या बाकावर बसून अनुभवलेला पाऊस आमच्या सरकारने रागच वाटायचा.
असा अवघड पाऊस
त्याच्या करामती काय सांगू
कागदाच्या बोटीसंगे
पाण्यामध्ये लागे रांगू
“येरे येरे पावसा तुला देतो पैसा” म्हणत आपण अंगणातल्या तळ्यामध्ये कागदाच्या बोटी खेळू लागतो आणि आपल्या बोटीबरोबरच  पाऊसही नाचू लागतो... विंदा करंदीकर यांची सर्वांना आवडणारी कविता -
‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच
काळा काळा कापूस पिंजला रे
ढगांशी वारा झुंजला रे...


हे गाणं म्हणताना अजूनही लहान झाल्यासारखं वाटतं. हे गाणं म्हणत आपल्यापैकी सर्वच नाचली असतील. कित्येक पिढ्यांनी हे गाणं अनुभवलं आणि आजही आजी नातवंडांना हे गाणं शिकवताना रमून जाते.शाळेच्या पत्र्यावर  पाऊस  जेव्हा टप टप टापा वाजवीत यायचा तेव्हा  पाऊस  घोड्यावर बसून भेटायला आल्यासारखा वाटायचा. हवाहवासा वाटणारा  पाऊस  झड लागली की मात्र नकोसा वाटायचा. सगळीकडे चिखल, राडा, ओले कपडे यामुळे आई वैतागायची. घरात ओली चूल पेटायची नाही. आई भिजायला जाऊ नको म्हटली तरी पण तिचा डोळा चुकवून कधी एकदा पावसात भिजायला जातेय आणि कधी नाही असं व्हायचं. पावसात भिजायला जायचं मग सर्दी, पडसं, खोकला, नाक गळणं, शिंका  हे ठरलेलं असायचं. पाऊस  नाही आला की निरभ्र आकाशाकडे पाहून म्हणायचं... “येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा  पाऊस  आला मोठा...”



ही गाणी म्हणत बालपण संपलं आणि शाळेच्या बाकावर बसून म्हटलेल्या पावसाच्या कविता आजही आठवतात... बालकवींची ‘श्रावणमासी’ ही नितांत  सुंदर कविता आजही जशीच्या तशी आठवते. त्या कवितेतून बालकवी भेटले. आमच्या गुरुजींनी ती कविता शाळेच्या जवळ असलेल्या टेकडीवर पावसात शिकवली. पावसाचा ओला स्पर्श मनाच्या आरपार गेला... तरुणपणात  पाऊस  भेटला तो गुलाबी रंगाचा हळव्या अंगाचा, लाजरा साजरा असा...


आणि माझ्या एका कवितेतून तो अधोरेखित झाला
पहिलं पहिलं प्रेम आपलं
पहिलाच गुलाबी  पाऊस
कॉलेज बाहेर भेट सखे
घरी नको जाऊस...
त्याने तिला लिहिलेल्या चिठ्ठीतील चार ओळी प्रत्येक पावसाळ्यात तिला आठवतात. आठवणीतल्या पावसाच्या अनेक कविता जन्माला येतात तेव्हा ऋतू कोणताही असला तरी मनाला त्या ओलावून जातात... उघड्या रानात  झिम्माडत येणारा पाऊस ना. धों. महानोर यांच्या अनेक काव्यरचनांमधून भेटतो...
नभं उतरू आलं,
चिंब थर्थर ओलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात
कवितेतील  पाऊस  हा निसर्गाचा उत्सव साजरा करतो असे वाटते. कधी  पाऊस  प्रियकर होतो तर धरती प्रेयसी. त्यांच्या कवितेतील  पाऊस  देहरूपात  भेटतो तेव्हा... तिच्या मनातील भावनेला तो साद घालतो.
“येरे घना येरे घना, न्हावू घाल माझ्या मना”  ती प्रेयसी त्याला काहीतरी सांगू पाहते...
पाडगावकरांच्या कवितेतील  पाऊस  हा त्यांच्यासारखाच मिस्कील स्वभावाचा... वेंगुर्ल्याचा  पाऊस  जेव्हा ही कविता ते सादर करायचे तेव्हा ते शब्द कोकणातील पावसाचे रंग उधळत यायचे...
वेंगुर्ल्याचा  पाऊस  कसा माया करीत यायचा
सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा
काळ्या कळ्या ढगात जेव्हा
आभाळ सगळं बुडायचं
पांढराशुभ्र बगळा होऊन
माझं मन उडायचं
पावसावर कविता लिहिली नाही असा एकही कवी आजवर मला भेटलेला नाही... माझ्या पावसाच्या कवितांवर मी जितकं प्रेम करते तितकच इतर कवींच्याही पावसाच्या कवितांवर प्रेम करते...
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील  पाऊस  अहिराणी बोलीचा दरवळ घेऊन येतो तेव्हा खानदेशात घेऊन जातो...
आला  पाऊस  पाऊस
आता सरीवर सरी
शेत शिवार भिजले
नदी नाले गेले भरी
आला  पाऊस  पाऊस
शिंपडली भुई सारी
शेत शिवार भिजले
नदी नाले गेले भरी
पावसाची अनेक रूपं कवींच्या कवितांमधून पाहायला मिळतात. कधी त्याचं अक्राळ-विक्राळ रूप पाहिलं की अंगाचा थरकाप उडतो. जेव्हा २२ जुलैला मुंबईमध्ये पाऊस  पडला त्यावेळेला काय अवस्था झाली होती हे सगळ्यांनीच अनुभवले आहे...
शशिकांत तिरोडकर यांची मिठी नदीवर असलेली कविता... आजही ऐकताना त्या दिवसाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते... खरंतर निसर्गाचं स्त्री रूप म्हणजे नदी असं समजलं जातं... आणि त्या नदीवर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा.. कवी म्हणतो -
नदीला जेव्हा नाला म्हटलं‌
तिथेच तिचं हृदय फाटलं
महानगरीवरचं तिचं प्रेम
भर पावसात आटलं
कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता ही अशाच पावसाच्या रुद्र
रूपावर आहे...
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली
घरट्यात राहून...
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातली जवळीक सांगणारी ही कविता. पावसामुळे घरातील सगळं काही वाहून जातं. त्यामुळे त्रस्त झालेल्या त्याची मनस्थिती कवितेतून  कवी व्यक्त करतो...
अशीच सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संतांची एक कविता मला अतिशय आवडणारी...
अंधाराने कडे घातले घराभोवती
जळधारांनी झडप घातली कौलारांवर
एकाकीपणा आले पसरत
दिशादिशातून घेरावयास्तव...
त्यांच्या मनाची असलेली अवस्था कवितेतून व्यक्त होते तेव्हा मनाचं आभाळ भरून येतं आणि त्या अंधारात विचारांच्या सरी झडप घालू लागतात किंवा त्यांचीच दुसरी कविता “ऐक जरा ना” कवयित्री पावसाला येऊ नको असे सांगते आणि का येऊ नको याचे उत्तरही खालील ओळींमधून देते...
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली


नको नाचू तडा तडा
असा कौलारावरून
तांबे सतेली पातेली
आणू भांडी मी कुठून
कवयित्रीचं घर चंद्रमौळी असल्यामुळे कौलारातून बघणारे पाणी साठवायला माझ्याकडे भांडीही नाहीत असे ती पावसाला सांगते.
प्रवासात भेटणारा  पाऊस  डोंगरावर पाय सोडून बसलेले ढग, वाहणारे नदी नाले, हिरवागार निसर्ग, झरझर आवाज करीत कोसळणाऱ्या सरी हे सगळं पाहिलं की ते निसर्गाचं आगळं वेगळं रूप डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्यावसं वाटतं आणि मग तेच कवितेतून अधोरेखित होतं. माझ्यात कवितेतील खालील ओळी
आली सर गेली सर
कुठे कुठे रेंगाळत
कुठे गडूळले डोह
कुठे ओघळ वाटेत
मला नेहमी वाटतं पाऊस  हा या धरतीचा प्रियकर असावा. आठ महिन्यांनी तो येतो आणि तिची प्रतीक्षा संपते. जेव्हा पहिला  पाऊस  तिला स्पर्श करतो तेव्हा तिच्या मनाचा गाभारा दरवळून जातो... आणि गर्भात पडलेल्या बियांना अंकुर फुटतात तेव्हा ती आई झाल्याचा आनंद व्यक्त करू लागते.
ऋतू आले, खेटुनी गेले
ना दुसरा मनात रुजला
पुन्हा भेटण्याचे वचन देऊन
पाऊस  काळीज घेऊन गेला
चार महिने त्यांचा मीलनाचा सोहळा संपवून  पाऊस  तिचं जणू काही काळीजच घेऊन निघून जातो आणि ती पुन्हा उदास होते. हिरवे अंकुर करपून जातात आणि ती विरहीनी पुन्हा त्याची वाट पाहू लागते. तेव्हा मला धरती राधेसारखी वाटते. प्रत्येक स्त्रीची व्यथा तिची भेगाळलेली काया व्यक्त करते. पुन्हा भेटीचे वेध लागतात आणि ती मेघराजाला बोलावू लागते...
अशा वेळेला वाटतं की, धरतीची लेक राधा आहे. राधेचं रूप माझ्यात आहे आणि तिघींचीही व्यथा एकच आहे आणि पुन्हा माझ्या कवितेतून पावसाला मी आमंत्रण देते ते असं...
पावसा पावसा
नको पाहू अंत
डोळ्यांमध्ये पाणी
मनामध्ये खंत
भेगाळली भुई
पानगळ झाली
आषाढ सरला
वाढली काहीली
आणि पुन्हा तो येतो... अनेक गाण्यातून कवितांमधून त्यांचा मीलन सोहळा साकार होतो... शांताबाईंच्या कवितेतील
दोन ओळी -
आला  पाऊस  मातीच्या
वासात गं
मोती गुंफित मोकळ्या केसात गं
किंवा
पाऊस  आला, वारा आला,
पानं लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे,
भर भर गारा वेचू ।।
अशा प्रकारे अव्याहतपणे चालणारं हे कवितेचं अन् पावसाचं नातं इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये रंगून जाणारं अलवार असलेलं...! शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन...
येतो नि जातो परतुनी पहातो
पुन्हा पुन्हा पावसाळा
डोळे भरूनी मी पाहते
त्याचा तो सोहळा.

Comments
Add Comment

कुमार सप्तर्षींची वादळवाट...

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी एका पिढीला निर्भयपणे विचार मांडण्याची हिंमत दिली.

जिम कॉर्बेटच्या सहवासात…

भटकंती-प्रल्हाद जाधव जिम कॉर्बेट हा नैनिताल येथील कालाढुंगी भागातील एक लोकप्रिय ब्रँड असून अर्थव्यवस्थेचा

अर्जुनाकडून अप्सरांचा उद्धार

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे महाभारतातील कुंती पुत्र अर्जुनाकडून शापीत अप्सरांचा उद्धार झाल्याची कथा

तुला न कळले, मला न कळले

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे पद्मभूषण ना. सी. फडके हे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे

बाप

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर बाप मनाच्या एका कोपऱ्यात तो अजून बसला आहे वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून...

पर्यावरण

जीवनगंध-पूनम राणे मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधारल्यासारखे झाले होते. सोसाट्याचा वाराही सुटला होता.