ट्रान्झिट कॅम्प : तात्पुरत्या घरांचा कायमचा धंदा

- क्राइम; अॅड. रिया करंजकर


मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक इमारती जुन्या झालेल्या आहेत. काही इमारती तर अक्षरशः मोडकळीस आलेल्या आहेत. अशा वेळी म्हाडाकडून या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्पची तात्पुरती सोय केली जाते. रहिवाशांची इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांना ट्रान्झिट कॅम्पमधून पुन्हा आपल्या इमारतीत राहण्याची सोय होते. बिल्डर रहिवाशांना भाडे न देता ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्याची सोय करतो. काही लोक मात्र ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत नाहीत आणि बिल्डरकडून भाडे घेतात.


ट्रान्झिट कॅम्प हा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी असतो. मात्र, या ठिकाणी राहायला येणाऱ्या काही लोकांकडूनच दलालीचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. ट्रान्झिट कॅम्पमधील खोल्या तिसऱ्या व्यक्तींना विकण्याची दलाली सध्या मुंबईसारख्या शहरांमध्ये केली जात आहे. शंकर यांना एका ओळखीच्या व्यक्तीकडून ट्रान्झिट कॅम्पमधील एक रूम विकली जाणार असल्याची माहिती मिळाली. रूमची किंमत कमी असल्याने तो विकत घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. रूम विकत घेतली तर त्यातून भाडे मिळेल, या शुद्ध हेतूने शंकर यांनी ती विकत घेण्याचे ठरवले.


ज्या व्यक्तीकडून शंकर यांनी रूम विकत घेतली, त्याचे नाव जयंत होते. रूम जयंत यांच्या नावावर होता. मूळ घर नवीन इमारतीसाठी तोडण्यात आल्यामुळे म्हाडाने जयंत यांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या नावाने ट्रान्झिट कॅम्पमधील ही रूम अलॉट केली होती. इमारत तयार झाल्यानंतर त्यांना ही रूम सोडून नव्या इमारतीतील घरात जावे लागणार होते. जयंत यांनी ही रूम विकण्याचे ठरवले आणि शंकर यांनी ती विकत घेतली. मात्र, म्हाडाच्या नियमानुसार रूम दहा वर्षे दुसऱ्या पार्टीच्या नावावर होणार नव्हती. दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही रूम जयंत यांच्या नावावरच असल्याचे शंकर यांच्या लक्षात आले. ही रूम आपल्या नावावर होणार नाही, हे ओळखल्यानंतर त्यांनीही ती विकण्याचे ठरवले.


याची माहिती तिथल्याच एका रहिवासी दलालाला मिळाली. त्याने ही खबर तिथल्याच दुसऱ्या दलालाला दिली. ‘ही रूम विकली जाणार आहे. तू याची फाईल घे आणि मला दोन लाख रुपये अगोदर दे,’ असे त्याने सांगितले. त्याप्रमाणे मुख्य दलाल असलेल्या सुरेशने दोन लाख रुपये देऊन ती फाईल घेतली आणि रूम विक्रीसाठी काढली.


सरकारी नोकरी करणाऱ्या सचिन यांना कमी पैशांत रूम मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी ती रूम विकत घेण्याचे ठरवले. सचिन यांनी पूर्ण रक्कम सुरेशला दिली. मात्र, सुरेशने शंकर यांना केवळ अर्धीच रक्कम दिली.


सुरेशने सचिनकडून पूर्ण रक्कम घेतली आहे, याची शंकर यांना माहिती नव्हती. त्याचवेळी ही रूम शंकर यांच्या नावावर नसून, ट्रान्झिट कॅम्पमध्ये रूम मिळालेल्या मूळ मालक जयंत यांच्या नावावरच आहे, याची माहिती सचिन यांनाही नव्हती.


याचाच फायदा सुरेशने घेतला.शंकर यांना सुरेशने सांगितले की, मूळ मालकाचे नाव काढावे लागेल आणि त्याठिकाणी तुमचे नाव टाकावे लागेल. त्यासाठी काही खर्च होणार आहे. दुसरीकडे सचिन यांना, ‘रूम मूळ मालकाच्या नावावर आहे. तो तुमच्या नावावर करण्यासाठी काही खर्च लागेल. तोपर्यंत रूम माझ्या ताब्यात राहणार, असे सांगण्यात आले.


दोघेही सुरेशच्या गोड बोलण्याला भुलले. व्यवहार पूर्ण होत असल्याचा त्यांना विश्वास होता. शंकर यांना वाटले की रूम आपल्या नावावर झाल्यानंतर व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. सचिन यांनाही आपल्या नावावर सर्व काही होईल आणि त्यानंतर कोणतीही अडचण राहणार नाही, असे वाटत होते.
याच भ्रमात दोघेही राहिले. रूमची चावी सुरेशने आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर घर घेणारा आणि घर विकणारा या दोघांनाही अंधारात ठेवून सुरेशने ती रूम पाच वर्षांसाठी हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिली. मात्र, याची खबर त्याने शंकर आणि सचिन यांना लागू दिली नाही.


तिकडे शंकर आणि सचिन दोघेही रूम आपल्या नावावर होईल आणि व्यवहार व्यवस्थित पूर्ण होईल, या प्रतीक्षेत होते. एक वर्ष निघून गेले. तरीही म्हाडामधून काम का होत नाही, हा प्रश्न दोघांनाही पडला. एके दिवशी शंकर रूमवर गेले. तेव्हा त्यांना तिथे दुसरीच व्यक्ती राहत असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर ही रूम सुरेशने पाच वर्षांसाठी हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिल्याचे समोर आले.


शंकर यांनी याबाबत सुरेशकडे विचारणा केली. मात्र, सुरेशने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. ‘नाव ट्रान्सफर करण्यासाठी भरपूर खर्च येतो. ते पैसे कसे उभे करणार? म्हणून मी हे केले. तुमच्याच फायद्याचे आहे,’ असे तो सांगू लागला.


दरम्यान, या हेवी डिपॉझिटचे पाच लाख रुपये सुरेशने अगोदरच घेतले होते. आता रूममध्ये राहणारा भाडोत्री ‘माझे पाच लाख रुपये द्या, तरच मी रूम खाली करणार,’ असा तगादा लावत होता.


शंकर यांनी ही गोष्ट रूम खरेदी करणाऱ्या सचिन यांना सांगितली. सचिन यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. तेही रूमवर आले आणि त्यांनी भाडोत्रीला रूम खाली करण्यास सांगितले.


मात्र, यावेळी आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. शंकर यांनी रूम सचिन यांना विकली आहे, याचा पूर्ण व्यवहार झाल्याचे कोणतेही कागदपत्र अस्तित्वात नव्हते. केवळ पैसे दिल्याचा व्यवहार झाला होता. रूम खरेदी-विक्रीचा अधिकृत व्यवहार झालेला नव्हता. या सगळ्या प्रकारात सुरेशने दोघांनाही चांगल्या प्रकारे फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले.


शंकर आणि सचिन यांना आपली घोर फसवणूक झाल्याची जाणीव झाली. शंकर यांच्या ताब्यात रूम असताना त्यात भाडोत्री होता. मात्र, रूम विकण्याचे ठरवताना त्यांनी तो भाडोत्री काढला होता. याचाच फायदा सुरेशने घेतला.


शंकर यांना वाटले होते की, सचिनने रूम खरेदी केल्यानंतर तो स्वतः राहायला येईल किंवा भाडोत्री ठेवेल. मात्र, तसे काही झाले नाही. सुरेश दोघांनाही फसवत राहिला आणि त्यातून स्वतःचा फायदा करून घेत राहिला. अखेर शंकर आणि सचिन यांनी आपली घोर फसवणूक झाल्याचे सांगत सुरेशविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. ट्रान्झिट कॅम्प म्हणजे तात्पुरता निवारा असतो. आपले मूळ घर आपल्याला मिळाल्यानंतर हा तात्पुरता निवारा सोडून जावे लागते. मात्र, काही दलालांकडून लोकांची घोर फसवणूक करून हेच रूम विकण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबईमध्ये अशा प्रकारांची सुळसुळाट वाढत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात

अंतरंग

- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड उद्योगपती आत्मानंद परब यांचे दुःखद निधन.” “वयाच्या ७०व्या वर्षी घेतला अखेरचा

लोककल्याणकारी तेजस्विनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे धर्मशीलता, दानशूरता, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा अद्भुत संगम