Sunday, July 26, 2026

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांवर मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.वारीदरम्यान पालखी मार्ग आणि पंढरपूर येथील आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले. ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली, तर १ हजार ६०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. (Ashadhi Wari )

वारीदरम्यान संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांवरही प्रभावी उपचार करण्यात आले. त्यामध्ये ४० हजार ९३३ तापाचे रुग्ण, ११ हजार ४८६ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ९ हजार ९७३ मधुमेहाचे रुग्ण, २३ हजार १०२ तीव्र श्वसन संसर्ग रुग्ण, १९ हजार ४७७ अतिसार , ५ हजार ४५५ आमांशाचे (डिसेंट्री) रुग्ण, तसेच २१४ रस्ते अपघातग्रस्त, ५१ हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण, ३६५ श्वानदंशाची प्रकरणे आणि १ सर्पदंशाचे प्रकरण यांच्यावर उपचार करण्यात आले. याशिवाय ३ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले असून इतर ६ लाख २९ हजार ६२९ रुग्णांनाही आवश्यक आरोग्य सेवा देण्यात आली. (Devendra Fadnavis)

वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ६९ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत होते. याशिवाय प्रथमच एअर ॲम्बुलन्स सेवा, 'आरोग्यसंपन्न वारी' वेब ॲप, पंढरपूरमधील २४ तास आयसीयू सुविधा, महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य जनजागृती आणि डिजिटल मॅपिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने वारीच्या संपूर्ण कालावधीत वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' ही संकल्पना यशस्वीपणे साकार केली.'आरोग्यसंपन्न वारी' वेब ॲपला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १ लाख ८ हजार ३८ वारकरी भाविकांनी घेतला लाभ.

मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी २०२६ निमित्त विकसित करण्यात आलेल्या 'आरोग्यसंपन्न वारी' वेब ॲपला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १ लाख ८ हजार ३८ वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा लाभ घेतला असून, वारीदरम्यान आवश्यक आरोग्य सेवा व इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे वेब ॲप विकसित करण्यात आले. या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा, डॉक्टरांची माहिती, आरोग्य केंद्रे, 'आपला दवाखाना', पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, मुक्काम व विसावा स्थळे तसेच महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांसह विविध अत्यावश्यक सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली होती.आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्हावा तसेच आवश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने हे वेब ॲप प्रभावी ठरले. विशेष म्हणजे वारीदरम्यान अनेक वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा वापर करून विविध सेवांचा लाभ घेतला आहे. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >