मराठवाड्यात रेल्वे क्रांतीची नांदी

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला आता नवी गती मिळणार आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाकांक्षी २४० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, या प्रकल्पामुळे मागासलेल्या रेल्वे सुविधांना मोठा बूस्टर मिळण्याची अपेक्षा आहे.


मराठवाड्यात रेल्वे विस्ताराच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच लोकसभेत याबाबत माहिती दिली. मराठवाड्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या नवीन रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले असून, अहवाल पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनासोबत पुढील चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित संस्थांकडून आवश्यक मंजुरी घेतल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाईल. कोणत्याही मोठ्या रेल्वे प्रकल्पाला तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय अशा विविध स्तरांवरील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. धाराशिव आणि बीड हे मराठवाड्यातील असे जिल्हे आहेत, जिथे रेल्वे सुविधांचा विस्तार तुलनेने कमी आहे. त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गामुळे या दोन्ही जिल्ह्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच व्यापार, उद्योग, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा रेल्वे मार्ग केवळ धाराशिव आणि बीड जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. या मार्गामुळे मराठवाड्यातील विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून, या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.



रेल्वेचा विकास हा कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. छत्रपती संभाजीनगर हे सध्या राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे. औद्योगिक विकास, उत्पादन क्षेत्र आणि लॉजिस्टिक हब म्हणून या जिल्ह्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा तसेच पुढील दक्षिण भारताशी अधिक थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या रेल्वे जोडणीमुळे केवळ प्रवाशांची सुविधा वाढणार नाही, तर मालवाहतुकीसाठी अधिक सक्षम आणि कार्यक्षम रेल्वे नेटवर्क उपलब्ध होणार आहे. विशेषतः शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही), अभियांत्रिकी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना या मार्गाचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कंटेनर, औद्योगिक कच्चामाल, तयार उत्पादने तसेच कृषी मालाची वाहतूक अधिक वेगाने आणि कमी खर्चात करणे शक्य होईल. परिणामी उद्योगांची कार्यक्षमता वाढेल आणि मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. हा रेल्वे प्रकल्प भविष्यात मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. दळणवळणाच्या सुविधांच्या बाबतीत मराठवाड्याने गेल्या काही वर्षांत प्रगती केली असली तरी अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. या भागाला सक्षम पायाभूत सुविधांची आवश्यकता असून, त्यासाठी प्रभावी नियोजन आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. वेळेची बचत आणि जलद प्रवासासाठी आज अनेक नागरिक विमानसेवेकडे वळत आहेत. मात्र, मराठवाड्यासारख्या आठ जिल्ह्यांच्या मोठ्या विभागात सध्या केवळ छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथेच विमानसेवा उपलब्ध आहे. भविष्यात या सुविधा अधिक जिल्ह्यांपर्यंत विस्तारल्यास प्रादेशिक विकासाला आणखी वेग मिळू शकतो. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीचे सक्षम जाळे निर्माण झाल्यास मराठवाडा केवळ राज्याच्या नव्हे, तर देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचा केंद्रबिंदूबनू शकतो.



जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील नागरिकांना विमान प्रवासासाठी आजही शेकडो किलोमीटरचा प्रवास करून विमानतळ गाठावे लागते. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथून मोजक्याच शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असल्याने अनेक प्रवाशांना मुंबई किंवा पुणे गाठून पुढील हवाई प्रवास करावा लागतो.
काही महिन्यांपूर्वी बीड येथे विमानतळ उभारणीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. प्रस्तावित विमानतळासाठी बीडमध्ये तांत्रिक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे बीड विमानतळाच्या उभारणीचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला असला, तरी प्रत्यक्ष कामाला गती कधी मिळते यावरच बीडकरांचे विमानतळाचे स्वप्न अवलंबून आहे.दरम्यान, लातूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ जून रोजी ५६ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून लातूर विमानतळाचा विकास होऊन आगामी काळात तेथून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तर नांदेड विमानतळावरून बंगळुरू, हैदराबाद, गाझियाबाद, गोवा, पुणे, अहमदाबाद आणि नागपूर या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.मराठवाड्यातील बीड आणि लातूर येथून आगामी काळात विमानसेवा सुरू झाल्यास या भागाच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नवीन रेल्वे मार्गांसोबतच विमानसेवेचा विस्तार ही मराठवाड्यासाठी निश्चितच आनंदाची बाब ठरत आहे.राज्य शासन आणि केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात असल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळत आहे.

Comments
Add Comment

चलनाचा बदलता चेहरा

भारतात रिझर्व्ह बँकेने प्रायोगिक तत्त्वावर दहा रुपयांच्या प्लास्टिक नोटा आणण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षित

स्टंटबाजी!

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी असा काही हल्ला चढवला, की त्याच्या चित्रफिती आणि छायाचित्रांनी समाज

निर्भीड पत्रकार: लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (२३ जुलै) १७० वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या आठवणींना दिलेला

Municipal Corporation : ‘सिटीलिंक’वर महापौरांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली सिटीलिंक बससेवा सध्या आर्थिक

‘किंग ऑफ द नॉर्थ’पर्व

ब्रिटनच्या राजकारणात नेतृत्वबदल झाला असून, लेबर पार्टीने अँडी बर्नहॅम यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी

वाढवण प्रकल्प; आर्थिक महत्त्वाकांक्षेचे केंद्र

भारत जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, वाढवण बंदर हे ब्ल्यू