Assam Flood Updates : आसाममध्ये पुराचा हाहाकार : २४ तासांत १० जणांचा मृत्यू; शिवसागर आणि जोरहाटला सर्वाधिक फटका

दिसपूर : आसाममध्ये पावसाचा जोर ओसरण्याचे नाव घेत नसून पुराचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. राज्यातील ११ जिल्हे सध्या या भीषण पुराच्या विळख्यात सापडले असून तब्बल ६.५ लाखांपेक्षा जास्त नागरिक यामुळे बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासांत पुरामुळे आणखी १० जणांचा मृत्यू झाला असून, यामुळे या वर्षात आसाममध्ये पुरामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या आता ४१ वर पोहोचली आहे.



शिवसागर, जोरहाट आणि चराईदेवमध्ये मोठे नुकसान


आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत शिवसागर आणि जोरहाट जिल्ह्यांत प्रत्येकी ३ जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय चराईदेव जिल्ह्यात २, तर कर्बी आंगलोंग आणि धेमाजी जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या शिवसागर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून येथे सुमारे ४ लाख लोक बाधित झाले आहेत. याखालोखाल चराईदेवमध्ये १.११ लाख, तर जोरहाटमध्ये ९७ हजारांहून अधिक नागरिकांना पुराच्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.



हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास पूरपरिस्थितीतून सुटका होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच पुढील चार दिवसांसाठी काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत ‘येलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे.



शेतीचे मोठे नुकसान आणि मदत कार्य सुरू


ASDMA च्या अहवालानुसार, संपूर्ण आसाममधील ९३९ गावे पाण्याखाली गेली असून २४,८९७ हेक्टरहून अधिक शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या राज्य प्रशासनाकडून १० जिल्ह्यांमध्ये ४८७ मदत छावण्या आणि मदत वाटप केंद्रे चालवली जात आहेत, जिथे २४,४१८ बेघर झालेल्या नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. भारतीय सेना, NDRF, SDRF, अग्निशामक दल, पोलिस आणि नागरी यंत्रणांच्या मदतीने चराईदेव, गोलाघाट, जोरहाट आणि शिवसागर जिल्ह्यांमधून ८,५०० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.



नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी


सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खोवांग येथील बुरीडीहिंग नदी, शिवसागरमधील दिखौ नदी, नुमालीगड येथील धनसिरी आणि श्रीभूमी येथील कुशियारा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय नांगलामुराघाट येथील दिसंग नदीने पुराच्या सर्वोच्च पातळीचा विक्रम मोडला असून ती अत्यंत धोकादायक स्थितीत वाहत आहे.



मुख्य सचिवांकडून पूरपरिस्थितीचा आढावा


आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पूरपरिस्थितीची उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला. त्यांनी सर्व संबंधित विभागांना पूरग्रस्त भागात मदत आणि पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेषतः चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांतील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मदत छावण्यांमध्ये अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच रस्ते व इतर सुविधांच्या तात्काळ दुरुस्तीसाठी भारतीय लष्कर, हवाई दल आणि NDRF सारख्या केंद्रीय यंत्रणांची मदत वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी