Monday, July 20, 2026

Nashik Accident News : मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, दोन दुचाकींना धडक; पती-पत्नीसह तीन जण गंभीर

Nashik Accident News : मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, दोन दुचाकींना धडक; पती-पत्नीसह तीन जण गंभीर

Nashik Accident News : पावसाळयात रस्ते निसरडे होत असल्याने वाहनचालकांना अत्यंत सावधपणे वाहन चालवणे आवश्यक आहे. कारण या निसरड्या रस्त्यावरून वाहने सरकणे, वळणावर वाहन अनियंत्रित होणे, असे प्रकार घडून भीषण अपघात घडतात. या कारणामुळे नाशिक जिल्ह्यातही अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव–येवला मार्गावरील बेलदारवाडी परिसरात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या ट्रकने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.(Nashik Accident News)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालट्रक येवल्याकडून नांदगावच्या दिशेने जात असताना बेलदारवाडीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील अचानकपणे नियंत्रण सुटले. त्यानंतर मालट्रकने येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली आणि धडकेनंतर मालट्रक रस्त्यालगत उलटला. या अपघातात किरण गोसावी (३२) आणि स्वाती किरण गोसावी (२६, रा. शास्त्री नगर, नांदगाव) या पती-पत्नीसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून स्थानिकांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने नांदगाव येथील रुग्णालयात दाखल केले .अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वळण रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. (Nashik Accident News)

वाहने सावकाश चालवा

दरम्यान, नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात कायमच वाहतूक कोंडी, अपघात असे प्रकार होत असतात. हा घाट वाहन चालकांच्या कौशल्याची परीक्षा पाहणारा मानला जातो. घाटातील काही वळणे धोकादायक आहेत. नवीन चालकांना या घाटात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. सावळघाट हा तीव्र उतार आणि चढीचा असल्याने पोलिसांकडून वाहन चालकांना कायमच या घाटातून जाताना सावधगिरीने वाहने चालविण्याची सूचना केली जाते. परंतु, अनेक वेळा वाहन चालकांकडून भरधाव जाण्याच्या नादात सूचनांकडे दुर्लक्ष होऊन अपघात होतात. यापूर्वी इथे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधरीत्या वाहन चालवणे गरजेचे आहे.

नाशिकमध्ये खाकीला डाग !

दरम्यान, खाकीला काळीमा लावण्याचे काम नाशिकमधील दोन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३० हजार रुपयांची लाच मागून यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरामण शेजवळ (५५, रा. मिलिंद रो-हाऊस, व्हिजन अकॅडमीमागे, जेलरोड, नाशिकरोड) आणि पोलीस अमलदार गणेश मुकुंद कुमावत (३८, कुलस्वामिनी अपार्टमेंट, औटी मळा, सामनगाव रोड) अशी या संशयितांची नावे आहेत. दोघेही शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा