Thursday, July 16, 2026

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांशी उत्तम ट्युनिंग, आमच्यात विसंवाद नाही!

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांशी उत्तम ट्युनिंग, आमच्यात विसंवाद नाही!

सुनील तटकरे; अर्थमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई : "आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज, विसंवाद अथवा अविश्वासाचा विषय नाही. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासोबत आमचे उत्तम ट्युनिंग असून, आगामी काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही अर्थमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंगळवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची बैठक झाली होती. या बैठकीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते, तसेच या गुप्त बैठकीविषयी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनभिज्ञ असल्याचा दावा काही जणांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी 'देवगिरी' निवासस्थानी सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांसोबत नेहमीच भेटी होत असतात, परंतु प्रत्येकच भेट राजकीय असते असे नाही. पक्षाच्या आणि राज्याच्या अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विशेषतः अर्थखात्यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत." (Sunetra Pawar)

जयंत पाटील यांच्यासोबत भेट झाली नाही

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील 'वर्षा'वर उपस्थित असल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावर स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले, "आमची आणि जयंत पाटील यांची तिथे कोणतीही भेट झाली नाही, आमच्या भेटीचा त्यांच्या भेटीशी काडीमात्र संबंध नाही." (Jayant Patil)

http://prahaar.in/2026/07/16/marathi-actors-divorce-shock-for-the-marathi-entertainment-industry-adinath-and-urmila-officially-announce-their-divorce/

विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या

 गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना तटकरे म्हणाले, "अजित पवार हयात असताना विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाच्या चर्चा नव्याने सुरू झालेल्या नाहीत.अजितदादांसारखेच आमचे सुनेत्रावहिनींसोबतही उत्तम ट्युनिंग आहे. आमच्यात सातत्याने चांगला संवाद होत असतो आणि पक्षातील प्रत्येक घडामोडीची माहिती आम्ही त्यांना देत असतो. त्यामुळे पक्षात कुठलाही गैरसमज असण्याचे कारण नाही," असे सांगत त्यांनी अंतर्गत वादाचे सर्व आरोप फेटाळून लावले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >