Tuesday, July 14, 2026

India Spain Relations : भारत-स्पेन आर्थिक भागीदारीला नवी चालना, उच्चस्तरीय बैठकींमधून व्यापार आणि गुंतवणुकीवर भर

India Spain Relations : भारत-स्पेन आर्थिक भागीदारीला नवी चालना, उच्चस्तरीय बैठकींमधून व्यापार आणि गुंतवणुकीवर भर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या १३ जुलै २०२६ रोजी सुरू झालेल्या अधिकृत स्पेन दौऱ्याला महत्त्वपूर्ण सुरुवात झाली. भारत आणि स्पेन यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे, व्यापार, गुंतवणूक, नवोपक्रम आणि औद्योगिक सहकार्य वाढवणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असून, त्यासाठी गोयल यांनी स्पेन सरकारचे वरिष्ठ मंत्री, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गुंतवणूक संस्थांच्या अधिकाऱ्यांशी अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. भारत आणि स्पेन हे दोन्ही देश राजनैतिक संबंधांची ७० वर्षे साजरी करत असून, २०२६ हे वर्ष ‘भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष’ म्हणून साजरे केले जात असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पीयूष गोयल(Piyush Goyal) यांनी स्पेनचे प्रथम उपाध्यक्ष तथा अर्थव्यवस्था, व्यापार आणि व्यवसाय मंत्री कार्लोस कुएरपो कॅबलेरो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक मजबूत करणे, बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे, लवचिक पुरवठा साखळी विकसित करणे तसेच अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि नवोपक्रम या क्षेत्रांतील सहकार्य विस्तारण्यावर भर देण्यात आला. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारासंदर्भातही दोन्ही बाजूंमध्ये विचारविनिमय झाला. नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’ यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यास सहमती दर्शविण्यात आली तसेच भारत-स्पेन संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाचे पुढील अधिवेशन वर्षअखेरीस आयोजित करण्याची तयारीही व्यक्त करण्यात आली.(India-Spain economic partnership)

यानंतर गोयल यांनी स्पेनचे उद्योग आणि पर्यटन मंत्री जॉर्डी हेरेउ बोहेर यांची भेट घेत औद्योगिक सहकार्य, शाश्वत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, गतिशीलता, रेल्वे, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर चर्चा केली. ‘मेक इन इंडिया(Make In India)’ अंतर्गत सी-२९५ कार्यक्रमाचे त्यांनी औद्योगिक सहकार्याचे यशस्वी उदाहरण म्हणून स्वागत केले.

स्पेनमध्ये आयोजित भारत-स्पेन बिझनेस फोरममध्ये पीयूष गोयल यांनी भारतातील वाढत्या गुंतवणूक संधी, वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आणि सुधारित उद्योग धोरणांची माहिती देत स्पॅनिश कंपन्यांना भारतात उत्पादन, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवोपक्रम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या फोरममध्ये दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती आणि व्यावसायिक प्रतिनिधींनी सहभाग घेत व्यापार आणि औद्योगिक सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा केली.

दौऱ्यादरम्यान पीयूष गोयल यांनी आयसीईईएक्स एस्पान्या एक्स्पोर्टासिओन ई इन्व्हेर्सिओनेस या स्पेनच्या व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. द्विपक्षीय गुंतवणुकीचा ओघ वाढवणे, उद्योग क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे आणि भारताच्या विकास प्रवासात स्पॅनिश कंपन्यांचा अधिक सहभाग सुनिश्चित करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. दिवसअखेर त्यांनी फिक्कीच्या नेतृत्वाखालील भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाशी संवाद साधत स्पेनमधील नव्या व्यावसायिक संधींचा आढावा घेतला आणि भारतीय उद्योगांना स्पेनमध्ये गुंतवणूक व भागीदारी वाढवण्याचे आवाहन केले. या दौऱ्यामुळे व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक सहकार्य आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून भारत-स्पेन धोरणात्मक आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा