TET Exam Paper Leak : चक्क बुटात प्रश्नपत्रिका, अवघ्या ८ हजारांसाठी ६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; TET पेपरफुटीची मोठी अपडेट समोर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-2026) पेपरफुटी प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती उघडकीस आली आहे. कोणतीही अत्याधुनिक सायबर यंत्रणा किंवा हॅकिंग न वापरता, अत्यंत जुन्या आणि साध्या पद्धतीने म्हणजेच बुटाच्या आत पेपर लपवून हा गैरप्रकार करण्यात आला आहे. भिवंडी पोलिसांच्या सखोल तपासानंतर, तब्बल सहा लाख भावी शिक्षकांच्या स्वप्नांचा व्यवहार अवघ्या ८ हजार रुपयांत झाल्याचे समोर आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती अनेक राज्यांपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.



कडेकोट सुरक्षेला 'बुटाची' गुंगारा


राज्यातील १,०२८ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छापण्याचे अत्यंत गोपनीय काम आग्र्यातील 'महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड' या छापखान्याला देण्यात आले होते. या ठिकाणी माजी सैनिकांचा कडक पहारा होता आणि कामगारांची दररोज कसून अंगझडती घेतली जात होती. मात्र, सुरक्षारक्षकांनी कामगारांचे बूट तपासण्याची तसदी कधीच घेतली नाही. याच एका गंभीर त्रुटीचा फायदा घेत, नरेशकुमार पुरनचंद माहौर ऊर्फ निक्की या कर्मचाऱ्याने १५ ते १७ जून दरम्यान पेपर-१ आणि पेपर-२ चे चारही संच बुटाच्या इनसोलखाली लपवून अत्यंत शिताफीने बाहेर काढले. त्यातच भर म्हणून, या अत्यंत संवेदनशील छापखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत होते, ज्यामुळे आरोपींचे मनसुबे सहज पूर्ण झाले.



८ हजारांची लाच अन् ८० हजारांना विक्री


या महाघोटाळ्याचे आर्थिक गणितही चक्रावून टाकणारे आहे. कामगार नरेशकुमारला हे देशद्रोही कृत्य करण्यासाठी अवघे ८ हजार रुपये रोख आणि भविष्यात एका प्लॉटचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याच्याकडून प्रत्यक्ष पेपर मिळवल्यानंतर, मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने स्वतःच्या दलालांच्या नेटवर्कमार्फत हीच प्रश्नपत्रिका थेट ८० हजार रुपयांना विकली. पुढे एजंटांनी त्यात स्वतःचे कमिशन लावून उमेदवारांची मोठी आर्थिक लूट केली. पोलिसांच्या रडारपासून वाचण्यासाठी हा पेपर व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर व्हायरल न करता, केवळ 'हार्ड कॉपी'च्या स्वरूपातच उमेदवारांपर्यंत पोहोचवला गेला.



मास्टरमाईंडचा 'पॅटर्न' आणि भिवंडी पोलिसांचा डमी सापळा


फरार असलेला मुख्य आरोपी बीजेंद्र गुप्ता हा कोणत्याही एका विशिष्ट परीक्षेला टार्गेट करत नव्हता; तर थेट देशभरातील गोपनीय छापखान्यांमधील कर्मचाऱ्यांना पैशांच्या जाळ्यात ओढून पेपर मिळवणे, हाच त्याचा मुख्य धंदा होता. मात्र, त्याच्या या मजबूत नेटवर्कला भिवंडीत सुरुंग लागला. २८ तारखेच्या परीक्षेच्या अवघे दोन दिवस आधी म्हणजेच २६ जूनला भिवंडी पोलिसांना या गैरप्रकाराची कुणकुण लागली. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी तातडीने शक्कल लढवत डमी ग्राहक पाठवून हा गोरखधंदा उघडकीस आणला. शिक्षण विभागाकडून पेपरची सत्यता पडताळल्यानंतर, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अतिरिक्त आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली.



देशभरातून १२ आरोपींना ठोकल्या बेड्या


भिवंडी पोलिसांच्या एसआयटीने बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये धडक मोहीम राबवून आतापर्यंत डझनभर आरोपींना गजाआड केले आहे:




  • २८ जून: धीरज बलराज सिंह (हरियाणा), राजीव शाव आणि आकाशकुमार सरोजकुमार (बिहार)

  • २९ जून: सुमन कुमारी (मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ताची पत्नी, पटना)

  • २ जुलै: सोनूकुमार सिंह, मिथुनकुमार सिंह (समस्तीपूर, बिहार) आणि कपिल कृष्णा दहिया (सोनीपत, हरियाणा)

  • ४ जुलै: संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा, बाबुलाल नारायणसिंह कुशवाह आणि नरेशकुमार ऊर्फ निक्की (सर्व रा. आग्रा)

  • ९ जुलै: नरेशकुमार यादव (नवी दिल्ली) आणि हरिओम पानू (हिस्सार, हरियाणा)


(सध्या पोलीस मुख्य सूत्रधार बीजेंद्र गुप्ता आणि त्याचा जवळचा साथीदार सोनू यांचा कसून शोध घेत आहेत.)



परीक्षा पद्धतीत होणार आमूलाग्र बदल?


एका साध्या मानवी चुकीमुळे आणि अवघ्या ८ हजार रुपयांच्या लालचेपोटी राज्याची संपूर्ण परीक्षा व्यवस्था किती कुचकामी ठरू शकते, हे या प्रकरणाने दाखवून दिले आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत, राज्य सरकारने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण परीक्षा संगणकीकृत (CBT - Computer Based Test) करणे, तसेच अत्यंत सुरक्षित डिजिटल पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्याच्या महत्त्वपूर्ण पर्यायांवर सरकार आता गांभीर्याने विचार करत आहे. भिवंडी पोलिसांच्या तत्परतेमुळे या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास दूर करणे हे आता प्रशासनापुढील मोठे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)