Monday, July 13, 2026

Shalarth ID Scam : 3 कोटींचा आलिशान बंगला, शिक्षकांकडून 20 ते 40 लाखांची उकळपट्टी; वाडिलेच्या साम्राज्याने तपास यंत्रणाही हादरल्या

Shalarth ID Scam : 3 कोटींचा आलिशान बंगला, शिक्षकांकडून 20 ते 40 लाखांची उकळपट्टी; वाडिलेच्या साम्राज्याने तपास यंत्रणाही हादरल्या

Shalarth ID Scam : उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा धुळे-जळगाव परिसरातील एजंट प्रशांत तुळशीराम वाडिले याला नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अटकेनंतर समोर आलेल्या माहितीतून शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे धक्कादायक जाळे उघड झाले असून, सरकारी यंत्रणेतील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांच्या संगनमताची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.

शिक्षण विभागात प्रभावी नेटवर्क

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वाडिले याने शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी प्रत्येक संशयित शिक्षकाकडून २० लाख रुपयांचा फिक्स रेट ठरवला होता. या पैशांची वाटणीही पद्धतशीरपणे केल्याचे समोर आले आहे.वाडिले हा स्वतः कडे १० ते १२ लाख रुपये ठेवून उर्वरित ८ ते १० लाख रुपये संबंधित वेतन पथक अधीक्षक कार्यालय, शिक्षण उपसंचालक आणि कार्यालयीन लिपिक यांच्यापर्यंत पोहोचवित होता. या संपूर्ण व्यवहारासाठी स्वतंत्र साखळी तयार करण्यात आली होती. वाडिलेने स्वतःला केवळ एजंट म्हणून मर्यादित न ठेवता शिक्षण विभागात प्रभावी नेटवर्क उभे केले होते. वेतन पथक, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि काही कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून शालार्थ आयडी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. (Shalarth ID Scam)

सरकारी निधीवर डल्ला

या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाडिलेने कागदोपत्री तब्बल ६५ हून अधिक आश्रमशाळा आणि शैक्षणिक संस्था दाखवल्या होत्या. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता साक्री आणि शिंदखेडा परिसरात केवळ दोनच संस्था अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित संस्था बनावट कागदपत्रे, खोटे नियुक्ती आदेश आणि बोगस शैक्षणिक नोंदींच्या आधारे उभ्या करण्यात आल्याचा संशय आहे. या माध्यमातून सरकारी निधीवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. (Shalarth ID Scam)

वाडिलेची मालमत्ताही कोटींमध्ये

तपासादरम्यान वाडिलेच्या मालमत्तेची माहितीही समोर आली आहे. धुळे शहरात सुमारे चार गुंठे जागेवर तीन कोटी रुपयांचा आलिशान बंगला, महागड्या कार, दुचाकी, विविध ठिकाणी फ्लॅट्स तसेच मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून ती घोटाळ्यातील पैशातून उभी राहिली का, याचा शोध घेतला जात आहे. (Shalarth ID Scam)

प्राथमिक चौकशीत वाडिलेने २७ शिक्षकांचे शालार्थ आयडी मंजूर करून दिल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व शिक्षकांची ओळख, त्यांनी दिलेली रक्कम आणि त्यामागील व्यवहार याचा तपास सुरू आहे. प्रत्येक शिक्षकाकडून किमान २० लाख रुपये घेतल्याचा संशय असून, या संपूर्ण घोटाळ्याची रक्कम ३० कोटी रुपयांहून अधिक असू शकते, असा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. (Shalarth ID Scam)

१७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी धुळ्यात सापळा रचून वाडिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकरोड न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाकडून सुरू आहे. (Shalarth ID Scam)

दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचले असून, आणखी काही एजंट, शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी तपासाच्या रडारवर आहेत. येत्या काही दिवसांत या घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >