संत ज्ञानेश्वर

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥
देखिला देखिला माये देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी ।
रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥



संत ज्ञानेश्वरांची ही प्रसिद्ध भूपाळी आहे. योगी, साधु, तपस्वी यांना सहजासहजी न आकळणारा देव आपण स्वतः प्रत्यक्ष पाहिला याचा आनंद या अभंगाच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतो आहे. अनंत वेशात वा रुपात ज्या परब्रम्हाला पाहिले त्याचे आत्मस्वरूप एकच आहे. हे तत्व त्यांनी मांडले आहे.
संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात, ‘‘जे योगीजनांनाही लाभणे दुर्लभ असतो तो सावळा विठ्ठल मी डोळ्यांनी पाहिला. पण कितीही पाहिले तरी मनाचे समाधानच होत नाही. हा देवांचाही देव आहे. माझ्या मनात त्याच्या स्वरुपाबाबत एक प्रकारचा संदेह होता. पण त्याला पाहिले आणि हा संदेह मिटला. मनातला दुजाभाव वा अंतरातही नाहिसा झाला. त्याला मी पाहिले ते वेगवेगळ्या वेशात आणि वेगवेगळ्या रुपात. या वेगवेगळ्या रुपात दिसणारे त्याचे स्वरुप एकच आहे याची खूण मनात पटली. अंगात त्याच्या स्वरुपाचे रंग सामावले. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा मनात बाणल्या. ’’
संत ज्ञानेश्वरांनी विटेवरच्या सावळ्या विठ्ठलाचे वर्णन केले आहे. हा देवाधिदेव म्हणजे देवांचा देव सहजासहजी कुणाला आकळत नाही. भक्तांची पूर्ण परीक्षा घेऊन मगच तो त्याच्या आकलनात येतो. हा विटेवरचा विठ्ठल कसा आहे? तो भक्तांचा सखा, सोयरा, आप्त, मायबाप सर्वकाही आहे. उत्कट भक्तीचे तरंग आपल्या अंतरंगात असतील तर तो सहजपणे वश होतो. मात्र, वर्षानुवर्ष कठोर तपसाधना करणाऱ्या योग्यांनाही तो आकळत नाही. त्यांच्या आकलनाच्या परिघाबाहेर राहतो.पंढरपूरचा हा विठ्ठल राजस, सुकुमार आणि मदनाचा पुतळा आहे. त्याचे सगुण रुप गोजिरे आहे. हा अवताराची राशी आहे. देवांचाही देव आहे. सहस्त्र सुर्याहूनही त्याच्या तेजाची आभा दीप्तीमान आहे. योग्यांना दुर्लभ असणाऱ्या विठुरायाचे दर्शन भक्तांना मात्र सहजपणे होते. विठ्ठल भेटला की काय होते? संत ज्ञानेश्वर आपल्या एका अभंगात म्हणतात,
तेणे तहान भूक नाही लाज-अभिमान ।
वेधिले जनार्दनी देवकीनंदनू गे माय ॥


- डॉ. देवीदास पोटे

Comments
Add Comment

संत मुक्ताबाई

प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण। दीपें दीप पूर्ण एका तत्त्वे।। देखिले गे माये पंढरी पाटणी। पुंडलिका अंगणी

संत नामदेव

बाळ सगुण गुणाचं तान्हं गे बाळ सगुण गुणाचं तान्हं गे। बाळ दिसतं गोजिरवाणं गे। काय सांगता

संत निवृत्तीनाथ

अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ अनुभवाच्या गावी ज्ञान हैंचि फळ। विज्ञान केवळ वृक्ष तया।। साधनी स्वानुभव अनुभवी

संत निळोबाराय

एवढासा माझा भाव तो कायी। तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं॥ परी तुमचें अगाध देणें। जाणवलें

संत नामदेव

वारंवार काय विनवावे आता। समजावें चित्ता आपुलिया ॥ तू काय म्हणशी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उडोनियां ॥ मजलागी

संत ज्ञानेश्वर

समाधि साधन संजीवन नाम। शांति दया सम सर्वांभूतीं॥१॥ शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू। हरिनाम उच्चारू दिधला