जनसंवाद

सोशल मीडियाचा वापर जपून करा


सोशल मीडिया हे संपर्काचे अत्याधुनिक साधन असले तरी गेल्या काही वर्षांत ते असहिष्णुतेचे वाहक बनले आहे. सोशल मीडियाचा विधायक कामासाठी वापर करणारे खूपच थोडे आहेत. याउलट सोशल मीडियाचा वाईट कामासाठीच जास्त वापर केला जातो. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जातात. बनावट खाते उघडून सामाजिक व धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट टाकल्या जातात. विरोधी मत मांडणाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमकावणे तसेच महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही वर्षांत देशात झुंडबळीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यालाही सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियावर आलेल्या संदेशाची कोणतीही खातरजमा न करता तो पुढे पाठवण्याची घातक सवय अनेकांना आहे. या सवयीमुळे काय अनर्थ घडेल, याचीही त्यांना कल्पना नसते. सोशल मीडियाचा वापर करणारे सगळेच सोशल मीडिया साक्षर नसतात. त्यामुळेच देशात असहिष्णुतेच्या घटना घडतात. सोशल मीडिया वापरकर्त्यांना सोशल मीडिया साक्षर करण्याची गरज आहे.- श्याम ठाणेदार, पुणे




राज्यातील उद्योग ठप्प


महाराष्ट्रातील बारा हजारांहून अधिक लघुउद्योग बंद पडल्याचे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने उद्योग ठप्प झाल्याचे आर्थिक चित्र चिंताजनक आहे. त्यावर परिणाम योजणे आवश्यक आहे. अशी वेळ येण्याआधीच या समस्या जाणून, विविध कारणे जाणून उद्योजक संघटनांशी सरकारी अधिकाऱ्यांनी चर्चा करणे आवश्यक होते. वीजदर हे सर्व राज्यात समान असले पाहिजेत. ज्या राज्यात लघुउद्योग आहेत, तेथील वीजदर अवाजवी नसावेत. प्रत्यक्ष महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास आर्थिक दृष्टीने तज्ज्ञांकडून करणे आवश्यक आहे. चाकण येथे उद्योग नगरीत २ जुलैला ३६ तास वीज नव्हती. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्याबरोबर राज्याचे उत्पन्नाचे होते. रोजगार बुडतो. एरवी घरगुती वीज विजेचा सरकारी महावितरण कंपनी लपंडाव खेळत आहे. रस्ते खराब राहतात, वाहतूक कोंडी तशीच राहते. गलथान आणि तोट्याचा कारभार सुधारणे आवश्यक आहे. यासाठी दिग्गज मर्यादित कंपन्यांचे सोलारसहित हरितसहित औष्णिक विद्युत निर्मिती क्षेत्रात आगमन होणे आवश्यक आहे.- गिरीश भागवत, पुणे




वीज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज


पावसाळ्यात महावितरण कंपनीचे आपत्कालीन व्यवस्थापन किती सक्षम आहे याचा अनुभव राजापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक घेत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यापासून दिवसांतून अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. शिवाय विजेवरची उपकरणे नादुरुस्त होतात.नाणार गावातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर उत्तर मिळते. नाणार फॉल्टी, २०-२४ तास बत्तीगुल, किती सहजपणे उत्तर मिळते. अशा वेळी ग्राहक हतबल होऊन जातो. ओव्हर हेड वायर तुटणे, झाडे उन्मळून पडतात, हे नैसर्गिक आहे. कुशल कामगारांचा अभाव, अपुरा कर्मचारी वर्ग ही देखील कारणे आहेत. महावितरण कंपनी पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण का करीत नाही. महावितरण कंपनीच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. प्रगतीकडे वाटचाल करण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. दरवर्षीचा हा अनुभव आहे. आजारी रुग्णांना खूपच त्रास होतो, विजेअभावी पाण्याचे पंप बंद पडल्याने घरात पाणी नाही. अशा अनेक समस्या निर्माण होतात.- महादेव गोळवसकर, मुंबई




विश्वविजेत्या संघाचा लाजिरवाणा पराभव


ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला ७६ धावात गुंडाळून १२५ धावांनी धूळ चारल्याने भारतीय संघाला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या सपाट खेळपट्ट्यांवर २००-२५० धावांचा लीलया पाठलाग करणारे स्टार भारतीय फलंदाज इंग्लंडच्या स्विंग आणि उसळी घेणाऱ्या गोलंदाजीसमोर पूर्णपणे ढेपाळले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघ ११.४ षटकांत सर्वबाद ७६ धावांत तंबूत परतला. सलग दुसऱ्यांदा टी-२० चे विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा हा सलग चौथा लाजिरवाणा पराभव ठरला. या पराभवाने सिद्ध केले आहे की, भारतीय खेळाडूंची आयपीएलमधील नेत्रदीपक कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवान खेळपट्ट्यांवरील सुमार कामगिरी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. - प्रदीप अनुसया शंकर मोरे, मुंबई




पावसाचा पाहुणचार


निसर्गाचा लहरीपणा व मानवनिर्मित भ्रष्टाचाराची जोड मिळाली की काय होते, याचा अनुभव सध्याचा धुवांधार पाऊस देत आहे. मुंबईतील ‘मिसिंग लिंक’च्या कामांपासून ते कोकणातील दापोली-खेड आणि दापोली-मंडणगड मार्गांच्या दुरवस्थेपर्यंत, पावसाने रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दर्जाची जणू पोलखोलच केली आहे. अवघ्या काही दिवसांच्या सरींनी सार्वजनिक कामांमधील निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचा बुरखा टरकावून टाकला असून, रस्ते नव्हे तर मृत्यूचे सापळे बनलेल्या या मार्गांनी प्रशासन आणि कंत्राटदारांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विकासकामांच्या नावाखाली खिशात गेलेला पैसा आणि कामातील अनास्थेचा हा ‘भांडाफोड’ आता केवळ संतापजनक नसून, जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या जबाबदार यंत्रणांवर कठोर कारवाईची मागणी करणारा आहे.- जयवंत नारायण चव्हाण, दापोली

Comments
Add Comment

नेटीझन्सकडून उथळपणाचा कळस

नाशिक जिल्ह्यावर ओढवू शकणारे संभाव्य ढगफुटीचे संकट टळल्याने मोठ्या अनर्थापासून संपूर्ण जिल्ह्याचा बचाव

भारताच्या निर्यातीला युरोपचा आधार

हेमंत देसाई रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, पुरवठा साखळीतील अडथळे आणि चीनमधील आर्थिक मंदीमुळे

राम भरोसे ‘ट्रस्ट’

अयोध्येतील राम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे, आस्थेचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे

शेतीविषयक अभ्यास दौरे

आपल्या देशात शेतीविषयक अभ्यास दौरे परदेशात शेतकऱ्यांचे आयोजित केले जातात. आता शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे.

जनसंवाद

सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा आरोग्यमंत्र्यांनी सोनोग्राफी केंद्रांमधील गैरप्रकार आणि गर्भलिंग

संकुचित राष्ट्रवाद

  अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जन्मजात नागरिकत्वाचा घटनात्मक अधिकार कायम ठेवत दिलेला निकाल हा केवळ एका