Thursday, July 9, 2026

FIFA WorldCup 2026: मोरोक्कोविरुद्धच्या लढतीपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का; मायकल ओलिसेवरील पिवळे कार्ड कायम

FIFA WorldCup 2026: मोरोक्कोविरुद्धच्या लढतीपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का; मायकल ओलिसेवरील पिवळे कार्ड कायम

फॉक्सबरो: फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी फ्रान्सला मोठा धक्का बसला आहे. पॅराग्वेविरुद्धच्या 'राउंड ऑफ १६' सामन्यात स्टार खेळाडू मायकल ओलिसेला दाखवलेले पिवळे कार्ड रद्द करण्याची फ्रान्सची याचिका फिफाने फेटाळून लावली आहे. फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांनी स्वतः बुधवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नक्की काय घडले?

फिलाडेल्फिया येथे पार पडलेल्या पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात, शेवटच्या मिनिटांमध्ये मायकल ओलिसे आणि माटियास गॅलार्झा यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर रेफरींनी ओलिसेला पिवळे कार्ड दाखवले होते. या घटनेच्या रिप्लेमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये फारसा संपर्क झाला नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ओलिसेने केवळ आपल्या तोंडासमोर बोट ठेवले असताना, पॅराग्वेचा खेळाडू गॅलार्झा चेहऱ्यावर फटका बसल्याचे नाटक करत जमिनीवर कोसळला होता.

या अन्यायी निर्णयाविरुद्ध फ्रान्स फुटबॉल महासंघाने फिफाकडे दाद मागितली होती. मात्र, फिफाने ही विनंती फेटाळत पिवळे कार्ड कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रान्सच्या अडचणीत वाढ

या निर्णयामुळे फ्रान्सच्या टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. मायकल ओलिसे आता 'यलो कार्ड ट्रॅप'मध्ये अडकला आहे. जर मोरोक्कोविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याला पुन्हा पिवळे कार्ड मिळाले, तर तो संभाव्य उपांत्य फेरीच्या सामन्यातून (स्पेन किंवा बेल्जियमविरुद्ध) निलंबित होईल.

केवळ ओलिसेच नाही, तर ब्रॅडली बारकोला आणि मनु कोने हे खेळाडू देखील पिवळ्या कार्डच्या कारवाईमुळे आधीच निलंबनाच्या छायेखाली आहेत.

ऑरेलियन शुआमेनीच्या तंदुरुस्तीबद्दल अपडेट

फ्रान्सच्या गोटातून एक सकारात्मक बातमी म्हणजे मिडफिल्डर ऑरेलियन शुआमेनी आता दुखापतीतून सावरत आहे. मांडीच्या दुखापतीमुळे त्याला पॅराग्वेविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. डेशॅम्प्स यांनी सांगितले की, "ऑरेलियनची प्रकृती सुधारत आहे. तो आज सरावात सहभागी होण्याची शक्यता आहे. बाकी सर्व खेळाडू मोरोक्कोविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि उपलब्ध आहेत."

उपांत्यपूर्व फेरीच्या या मोठ्या सामन्यात आता डेशॅम्प्स आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना पिवळे कार्ड मिळण्यापासून कसे वाचवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा