पावसाळ्यापूर्वी सतर्कता हवी
चेंबूर येथे झाड पडून घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वीही अशा दुर्दैवी घटना पाऊस काळात घडलेल्या आहेत. या सर्वसामान्यांच्या वाचनात, पाहण्यात, अनुभवण्यात दरवर्षी येतात; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या, त्यांच्या खात्यांच्या पाहण्यात, वाचनात येत नसावे का? हा खरा प्रश्न आहे. पावसाळी अपघात दुर्घटना घडू नयेत म्हणून पालिका प्रशासनाने पावसापूर्वीच सतर्क राहणे, अपायकारक जागी योग्य कारवाई करणे आवश्यक असताना प्रशासन मात्र सामसूम असते किंवा त्याला हवी तर प्रशासकीय चालढकल म्हणा. मात्र सर्व खाती ऐन पावसाळ्यात जागी होतात; परंतु तेव्हा फार उशीर झालेला असतो, म्हणजेच वरातीमागून घोडे हा प्रयोग दरवर्षी सुरूच असतो. - विश्वनाथ पंडित, ठाणे
देवाच्या दारीची चोरी
देवाच्या गल्ल्यावर डल्ला मारणे, तेही रामलल्लाचा डोळा चुकवून. अशा चतुर, सरावलेल्या, निर्ढावलेल्या ढोंगी कर्मचाऱ्यांची अशी स्वार्थ आणि अर्थ भक्ती काही नवीन नाही. आर्थिक सुबत्तेचे विक्रम प्रस्थापित करणारी, देवाच्या नावाने बाजार मांडणारी भारतातील धार्मिक स्थळे तेथील आर्थिक गैरव्यवहारांसाठी तितकीच प्रसिद्ध आहेत. जनतेच्या डोळसपेक्षा अंधश्रद्धेचाच वारेमाप फायदा उचलणाऱ्या धेंडांचा पुरता बंदोबस्त तेथील सहभागी व्यवस्थेने कधीच केला नाही. कारण तशी कठोर मानसिकताच दाखवली गेली नाही. ट्रस्ट या शब्दाचा अभिप्रेत असलेला खरा अर्थ पार नष्ट झाल्यामुळे लोकांचा त्यावरील ‘ट्रस्ट’ उडाला आहे. जे हात श्रद्धेने जोडले जाणे अपेक्षित आहे, संस्कृतीला अभिप्रेत आहे, तेच हात जर लोकांनी देवस्थानाला दान केलेली संपत्ती लुटण्यात दिवस-रात्र गुंतलेले असतील तर ते हात त्वरित तोडलेच पाहिजेत. आज अशाच अत्यंत कठोर शिक्षेची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जरब त्यातील अनेक पळवाटांमुळे निष्प्रभ ठरते आणि पुन्हा असाच गुन्हा करण्यापासून गुन्हेगारांना रोखू शकत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. स्वतःच्या ताब्यातील दानपेट्या, वैयक्तिक खात्यावर दहा वर्षे लोकांचा पैसा जमा करण्यापर्यंत मजल गेलेल्या या मस्तवाल भक्तगणांना योगी आदित्यनाथ बुलडोझरची शिक्षा ठोठावतील का ? - हेमंतकुमार मेस्त्री, मनोर
विवाह - मध्यस्थी - आणि कुटुंबे
सध्या मुला - मुलींच्या अपेक्षा त्यांचे विवाह जमविण्यात अडचणी निर्माण करताना दिसतात. केवळ उच्च शिक्षण, नोकरी यामुळे दोन कुटुंबे एकत्र येणे दुरापास्त ठरून मध्यस्थी व्यक्ती वाईटपणाला नाहक कारणीभूत ठरते आहे. मान्यवर मंडळी, नातेवाईक आपल्या मुलां-मुलींचे विवाह जुळविण्याच्या विषयात मागे पडताना दिसतात. चौकशीच्या माध्यमातून खरी माहिती समोर येत नाही आणि फसवणुकीचे प्रसंग ओढवतात. मध्यस्थी ही व्यक्ती केवळ दुवा किंबहुना दोन कुटुंबांची सोयरीक जोडणारी असते. याचा अर्थ त्यांनाही मुला-मुलींची संपूर्ण माहिती असतेच, असे नाही. वास्तविक स्थळ समोर आल्यावर पालकांनी स्वतः लक्ष घालणे क्रमप्राप्त असते. पण तसे होताना दिसत नाही, म्हणूनच मध्यस्थी व नातेवाईक मंडळी लग्नाच्या गाठी बांधण्यासाठीचे प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळेच समाजातील चांगल्या परंपरा संपुष्टात येतील की काय अशी भीती वाटणे स्वाभाविकच आहे. सध्या अनेक मुले-मुली अविवाहित आहेत. पैशाच्या लोभाने दिवस-रात्र कामे करताना दिसतात. पण जीवनसौख्य मिळत नाही. शहरी भागात रात्री-बेरात्री चौका-चौकातून ही मंडळी चहापान, खाणेपिणे आणि अन्य व्यसनात दंग झालेली दिसतात. कोणीतरी पालक याचा विचार करणार आहेत का, की केवळ पैसे हेच ध्येय ठेवून कुटुंबे उद्ध्वस्त होत राहणार? - अमोल करकरे, खेड -रत्नागिरी
जनआरोग्य योजनेचा गाभा जपा
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत. अनेक रुग्णालयांनी आर्थिक अडचणींची पर्वा न करता प्रामाणिकपणे गोरगरीब रुग्णांना यासाठी सेवा दिली. मात्र या रुग्णालयांना योजनांतर्गत उपचारांचे थकीत देयक वेळेवर न मिळाल्याने ही रुग्णालये आर्थिक संकटात सापडत आहेत. हा गंभीर प्रश्न आमदार राम कदम यांनी विधानसभेत उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले, ही स्वागतार्ह बाब आहे. रुग्णालयांना वेळेवर योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर त्याचा परिणाम थेट गरीब रुग्णांच्या उपचारांवर होऊ शकतो.त्यामुळे सरकारने प्रलंबित देयके तातडीने अदा करून भविष्यात अशा विलंबाची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी ठोस व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. - केतन भोज, घाटकोपर
उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा
महापालिकेच्या अन्न व औषध विभागाच्या सूचनेनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गाड्या तसेच दुकानांना खाद्यपदार्थ झाकून ठेवणे बंधनकारक आहे. जाळीदार झाकणीने किंवा पारदर्शक प्लास्टिकने असे पदार्थ झाकून ठेवणे अपेक्षित असते; मात्र मुंबई-ठाण्यासारख्या प्रदूषित शहरात पालिकेच्या या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते. पावसाळा सुरू झाल्याने ऐन पावसात भजी, वडे यांसारखे पदार्थ टपरीवर जाऊन गरमागरम खाण्याची चाकरमान्यांना मोठी हौस असते. मात्र अनेक ठिकाणी हे पदार्थ उघडेच ठेवलेले दिसून येत आहेत. मुंबईकरांना यंदाच्या जीवघेण्या उकाड्याने राज्यातील जनतेला जगणे नकोसे केले होते. आता पावसाच्या तोंडावर पसरणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे असणार आहे, त्यासाठी उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून पालिकेने मुंबईकरांना आश्वस्त करावे. - सौ. मोक्षदा घाणेकर, मुंबई