मराठवाड्याला केंद्रात मंत्रीपद?

मराठवाडा-डॉ. अभयकुमार दांडगे


 

ऑपरेशन टायगरनंतर मराठवाड्यातील राजकारणाने नवे वळण घेतले असून आता दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने या घडामोडींना अधिक वेग दिला आहे. उद्धव ठाकरे गटातील तीन खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर त्याचे राजकीय 'रिटर्न गिफ्ट' म्हणून मराठवाड्याला केंद्रात मंत्रीपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर मराठवाड्यातील राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे. उबाठा गटातील सहापैकी तीन खासदार हे मराठवाड्यातील. शिवसेनेत सहा खासदारांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणारे परभणीचे खासदार बंडू जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारात स्थान दिले जाईल, अशी चर्चा मराठवाड्यात सुरू झाली. दुसरीकडे पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑपरेशन टायगर मोहिमेत सहभागी झाल्यानंतर जाम संतापले. त्यांनी ऑपरेशन टायगरपूर्वीच या हत्याकांड प्रकरणात त्यांना केंद्राकडून जे अपेक्षित होते, तो निरोप अगोदरच दिला होता; परंतु सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्यांना धक्काच बसला. आता खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रीपदाचा शब्द केंद्रातून मिळाला असल्याची चर्चा मराठवाड्यात रंगलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपदाची चर्चा रंगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्या विस्तारामध्ये मराठवाड्यातील या दोन पैकी एका खासदारांचा समावेश असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.


महाराष्ट्राचे राजकारण हे सदैव मराठवाड्याभोवती फिरत असते. उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पूर्वी मराठवाड्यात होता; परंतु आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे. पंचायत समितीच्या राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत केवळ सत्ताधाऱ्यांच्या मागे - पुढे फिरणाऱ्यांची चलती आहे. हे ओळखून मराठवाड्यातील आजी-माजी खासदार तसेच आमदारही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले जात आहेत. उद्याचे उद्या पाहू, येणारी निवडणूक पाहता येईल, आजचे काय? हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे. याच दृष्टिकोनातून मराठवाड्यातील तीन खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची वाट धरली. मराठवाड्यातील ज्या तीन खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली, त्यामध्ये त्यांचा मोठा फायदा दिसून येतो. एक तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत राहिल्याने स्वतःच्या मतदारसंघातील कामे तसेच राज्यात स्वतःची चलती. दुसरीकडे केंद्रात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत त्यांचे हात बळकट केल्याने दिल्लीश्वरांचा आशीर्वाद, हे त्यामागचे खरे गणित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील अनेकांच्या नजरा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागेल, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापाठोपाठ मराठवाड्यातून एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातून केंद्रात कोण जाणार याची चर्चा मराठवाड्यात रंगलेली आहे.


धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सीबीआय विशेष न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडप्रकरणी त्यांना अपेक्षित निकाल न आल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यावर किंबहुना केंद्रावर नाराज आहेत; परंतु त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाईल, अशी राजकीय चर्चा मराठवाड्यात होत आहे. निंबाळकर गोटातून अशी चर्चा पुढे आल्याने परभणीचे खासदार बंडू जाधव यांचे मंत्रीपद हुकणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात सहा खासदार जमवत असताना परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी इतर खासदारांची फिल्डिंग लावण्यासाठी चांगलीच मदत केली होती. त्या मदतीपोटी सुरुवातीला त्यांना मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जाते; परंतु आता त्यांना मंत्रीपदातून बाजूला ठेवून खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. ऑपरेशन टायगर प्रकरणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबाच्या पत्रावर उशिरा स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल व त्यांचा पक्षप्रवेश यामध्ये दोन दिवसांचा फरक होता. त्यामुळे त्यांच्या केंद्राकडून वेगळ्या अपेक्षा होत्या; परंतु त्या अपेक्षा फोल ठरल्याने त्यांची राजकीय खदखद वाढली.


मराठवाड्यातील तीन खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राजकीय झोपेतून जागे झालेले उबाठाचे उरलेसुरले नेते हे मराठवाड्यात अवतरले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण करून स्वतःचे समाधान करून घेतले. आपल्या भाषणात शिव्या घातल्या की टाळ्या मिळतात, हे माहीत असल्याने त्यांनी आपले भाषण त्याच दिशेने चालू ठेवले. मराठवाड्यात त्यांच्या भाषणाला टाळ्या तर मिळाल्या, परंतु त्यांना कसलाही राजकीय लाभ त्यामधून झाला नाही किंवा भविष्यात होणार नाही, असेही मराठवाड्यातील त्यांच्या राजकीय सभांमधून स्पष्ट झाले. एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे हे काल नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. ही सर्व राजकीय खदखद पूर्वीच व्हायला होती; परंतु ज्या ठिकाणी त्या पक्षाचे नेतेच लक्ष द्यायला तयार नाहीत, तेथे कार्यकर्ते तरी काय करणार? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या आमदार व खासदारांची विशेष काळजी घेतात. त्यांनी लगेच या घटनेची दखल घेतली. स्वतःच्या मुलासोबत केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्याला न्याय दिला जाईल, असा शब्द त्यांनी या पक्षप्रवेश प्रसंगी खासदारांना दिला होता. त्यामुळे मराठवाड्यातून कोणाला तरी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

स्मृती आणि संघटन

प्रदीप पाटील   कोणत्याही शहराचा इतिहास इमारती, रस्ते किंवा विकासकामांनी घडत नाही; तो घडतो नि:स्वार्थी

जनसंवाद

पावसाळ्यापूर्वी सतर्कता हवी चेंबूर येथे झाड पडून घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वीही अशा दुर्दैवी

परीक्षांची परीक्षा

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचे वादळ अद्याप शांत झालेले नसतानाच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी

भांडणे नकोत, विकासकामे हवीत

लोकशाही व्यवस्थेत मतभेद अपरिहार्य असले तरी ते सभागृहाच्या चौकटीत आणि सभ्य भाषेत मांडले जाणे अपेक्षित असते.

भूकंपापेक्षा निष्काळजीपणा जास्त विनाशकारी

जनार्दन पाटील   आपण निसर्गाला जिंकू शकत नाही; परंतु त्याच्या धोक्यांपासून स्वतःचे रक्षण नक्कीच करू शकतो.

जनसंवाद

नाट्यसृष्टीतील दीपस्तंभ नाट्य विश्वात त्यांना सारे आदराने बाई म्हणूनच ओळखत, अशा मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ,