जनसंवाद

दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमी बस हवी


मुंबईतील दादर हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असून, मुंबई व उपनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोक मृत व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी दादर येथील स्मशानभूमीत येत असतात. त्यांना स्मशाभूमीत जाण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनपासून चालत किंवा टॅक्सीने जावे-यावे लागते. बाहेरून येणाऱ्या कित्येक जणांना विचारत विचारत जावे लागते. अशा लोकांसाठी बेस्टने दादर (पश्चिम) स्टेशनपासून स्मशान भूमीपर्यंत बस मार्ग चालू करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.- अनंत आंगचेकर, भाईंदर



वटपौर्णिमेच्या दिवशी यमराजाचा भीमराव कांबळेला फास


भीमराव कांबळे या नराधमाला केवळ ५५ दिवसांचा फास्ट ट्रॅक खटला चालवून न्यायालयाने कांबळेला दिलेली मरेपर्यंत फाशीची शिक्षा हा ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या कार्यपद्धतीवरचा विश्वास आहे. सत्यवानाला जीवदान देणारे यमराज वटपौर्णिमेला पुण्याच्या शिवाजीनगरच्या न्यायालयात जणू काही सकाळपासून ठाण मांडूनच बसले होते की काय? अशी शंका येते. आता फक्त ते त्यांच्या हातातला फास कांबळेच्या गळ्याभोवती कधी आवळणार याचीच प्रतीक्षा सर्वांना आहे. अशा नराधमांना जरी घटनेत तरतूद नसली तरी भर चौकात फाशी दिली तरच फरक पडेल. घटनाबाह्य मंदिरे उभारून मंत्र्यांचे शपथविधी होतातच की, शपथ घेऊन किती इमान राखतात?, हेही सर्वश्रुत आहे. मग फाशी ठरलेल्या तख्तावर नराधमांना फाशी न देता भर चौकात देऊन जनमानसात न्यायालयाने नवीन भूमिका बजावली तर काय हरकत आहे?- अमोल करकरे, खेड-रत्नागिरी



ओळख पुराव्याची सक्ती हटवा


राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांना माहिती अधिकार प्रतिबंध म्हणजे, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला! नागरिकत्व सिद्ध करणारा ओळख पुराव्याची सक्ती करणे म्हणजे कायद्याने दिलेल्या अधिकारावर अतिरिक्त निर्बंध लादल्यासारखे आहे. माहिती अधिकार अधिनियमात १५० शब्दांची अट नसताना ही अट घालण्यात आली. हा प्रकार म्हणजे अधिकार मर्यादित करण्यासारखा आहे. प्रथम अपीलसाठी ५० रुपये आणि द्वितीय अपीलसाठी १०० रुपये शुल्कवाढ म्हणजे न्याय मिळणं महाग व कठीण होते. शासनास वकील नेमण्यास परवानगी, तर अर्जदारास वकील नेमण्यास मनाई करणे हे स्पष्टपणे असमान आणि भेदभावपूर्ण आहे. सार्वजनिक हित सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त पुराव्याची जबाबदारी अर्जदारावर टाकणे हे कायद्याच्या चौकटीबाहेर आहे. माहितीचा अधिकार हा केवळ उपस्थितीवर अवलंबून ठेवणे आणि अपील फेटाळणे हे कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासणारे आहे. अशा प्रकरणात अनेकदा तक्रारदारांना वेळेत सुनावणीची तारीख कळणार नाही, अशी मुद्दाम दक्षता घेतली जाते. मृत्यू झाल्यास अपील बंद न करण्याची तरतूद अयोग्य आहे. वारसदारांना ती अपील पुढे चालवू द्यावी. कारण, याआधी माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. सरकारने मृत्यूनंतर अपील बंद केली तर अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या वाढतील. त्यामुळे अर्जदाराच्या मृत्यूनंतरही त्याने मागवलेली माहिती सार्वजनिक करण्याची तरतूद ठेवावी.- नितीन कदम, मुंबई



रेल्वे प्रवासातील असुरक्षितता


रेल्वे लोकल सेवा प्रवाशांची धमणी म्हणून ओळखली जाते. दररोज तिन्ही मार्गावर सुमारे सत्तर लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पण या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? रेल्वे प्रशासनाने मुंबईतील बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया यानिमित्ताने प्रत्येक रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. बॅग तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्यानंतर मात्र ‘आवजाव घर तुम्हारा’ एवढी ढिसाळ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली. रेल्वे प्रवासात धावपळ ठरलेली असते. कार्यालयात वेळेवर पोहोचणे हे एकच ध्येय डोळ्यांसमोर असते. त्यात लोकल उशिराने सुटली किंवा रद्द झाली तर कुत्रा हाल खात नाही. लोकल प्रवासातील गटबाजी इतर प्रवाशांच्या जीवावर बेतते. डब्यांत गर्दी तर असतेच, त्यात गटबाजीला नवीन प्रवाशांना सामोरे जावे लागते. रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. रेल्वे प्रवासात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून झाला. रेल्वेच्या हद्दीत प्रवाशाकडे शस्त्र आले कसे?, सक्षम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे, तर तपासणीत शस्त्र कसे सापडले नाही.- महादेव गोळवसकर, मुंबई



संवाद हरवल्याचे दुष्परिणाम


सिया गोयल या तरुणीने आपल्या नियोजित वराची (पतीची) प्रियकराच्या मदतीने केलेली निर्घृण हत्येची घटना नातेसंबंधांबरोबरच विवाहसंस्थेसमोरही मोठे आव्हान निर्माण करणारी आहे. विशी पंचविशीची नवी पिढी आभासी जगात वावरत आहे. नातेसंबंधात संवाद खुंटले आहेत. फाजील अपेक्षा आणि स्वप्नांची ओझे घेऊन वावरणारी नवी पिढी जीवनाविषयी गंभीर आहे, असे वाटत नाही. प्रेम करणे किंवा प्रेमळपणा हा स्त्रीचा स्थायीभाव सांगितला जातो; परंतु अलीकडे या समजाला छेद देणाऱ्या भयंकर घटना घडत आहेत. जीवापल्याड प्रेम करणारी स्त्री आणि टोकाचा अतिरेकी द्वेष करणारी स्त्री ही स्त्रियांची दोन रूपे पाहता स्त्री मनाचा थांग लागणे भयंकर कठीण आहे. कोणत्याही कृतीच्या गंभीर परिणामाची कणभर ही जाणीव नसणाऱ्या या वर्गाची अपरिपक्वताच पुढील अनर्थास कारणीभूत ठरत आहे. आभासी जगाच्या वाढत्या आक्रमणाने आणि धावत्या जीवनशैलीमुळे पाल्य आणि पालकांमधला संवादच हरवला आहे. केतन अग्रवाल हत्येच्या घटनेसंदर्भात बोलायचे झाले तर कोणा निरापराध्याचा जीव घेण्याचा अधिकार निश्चितच कोणालाच नाही.-श्रीकांत मा. जाधव, सातारा

Comments
Add Comment

‘टक्केवारी’च्या व्हिडीओने खळबळ

कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित कथित ‘टक्केवारी’ प्रकरणाची चर्चा राज्यभर

विरोधकांना चपराक

नरेंद्र मोहिते   राजापूर तालुक्यासह कोकणातील अन्य ठिकाणी नव्याने प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा

हवामान बदलाची दाहकता

हवामान बदलामुळे भारतात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि कालावधी वाढत आहेत. वाढते तापमान, जंगलतोड, शहरीकरण आणि

मेहनतीशिवाय यश नाही

विद्यार्थ्यांचे यश केवळ परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसून आत्मविश्वास, नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि

नागपूरच्या विकासाला नवे पंख

नागपूरच्या १०९ वर्षांच्या ऐतिहासिक विमानतळाच्या विकासाला आता नवे पंख लाभणार आहेत. ‘जीएमआर एअरपोर्ट्स’कडे

पादचाऱ्यांचे काय?

एखादे मूल शाळेत जाताना, एखादा वृद्ध रस्ता ओलांडताना किंवा एखादी महिला कामावर जाताना सुरक्षितपणे घरी परतेल याची