Minister Bawankule : मंत्री बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात; "अहंकारामुळे पक्ष रसातळाला, आता फक्त आदित्य ठाकरेंनी बाहेर पडायचं बाकी!"

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाचे वरळीतील खंदे आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. या धक्कादायक राजकीय भूकंपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. "ठाकरे गटाच्या प्रमुखांच्या प्रचंड अहंकारामुळेच आज त्यांचा पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. एकामागून एक मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत आणि आता या पन्हाळ्यातून केवळ आदित्य ठाकरे यांनीच बाहेर पडायचे बाकी राहिले आहे," असा थेट आणि मर्मभेदी टोला बावनकुळेंनी लगावला आहे.



मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, केवळ रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घेणे, प्रसारमाध्यमांसमोर इतरांवर तोंडसुख घेणे आणि भाषणाबाजीतून टोमणे मारणे याने पक्ष चालत नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विनाकारण चिखलफेक करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या घरात चाललेली गळती रोखण्याकडे आणि आपला पक्ष सांभाळण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीची कुणकुण लागली होती, तेव्हाच त्यांनी जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांचे दौरे करायला हवे होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना जर ठाकरेंनी मंत्रालयात बसून जनतेला आणि स्वतःच्या आमदारांना वेळ दिला असता, तर आज त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली नसती. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या अवाजवी लालसेपोटी आणि हट्टापायी त्यांनी स्वतःच्या हाताने कमावलेले सर्व काही गमावून बसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.



सचिन अहिर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा ठाकरे गट सोडणे हा त्या पक्षासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, अहिर यांच्या जाण्याने आता ठाकरे गटात उरलेच कोण आहे? उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या भोवतालच्या चौकडीने आतातरी आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आलेख सातत्याने उंचावत असून त्यांचा पक्ष वाढत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष रसातळाला जात आहे. हा पूर्णपणे त्या दोन पक्षांमधील अंतर्गत विषय असून, या पडझडीशी भाजपचा काडीचाही संबंध नाही. सकाळच्या पत्रकार परिषदांमधून जी विषवल्ली पेरली जात आहे, त्याच अहंकारामुळे निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते आज ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचा दावा त्यांनी केला.



ठाकरे गटाच्या या दुर्दशेला त्यांची वैचारिक गद्दारीच कारणीभूत असल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला. २०१९ मध्ये भाजपसोबतची नैसर्गिक युती तोडणे, बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाशी फारकत घेणे आणि ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध केला त्यांच्याच विचारसरणीला मिठी मारणे, यामुळेच आज 'उबाठा'वर ही वेळ आली आहे. जर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला नसता, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री म्हणून सन्मानाने सत्तेत आले असते. महायुतीचे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालले असते आणि मुंबई महानगरपालिकेवरही त्यांचेच वर्चस्व राहिले असते. मात्र, स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या घमेंडीत त्यांनी पक्ष आणि विचार दोन्ही गहाण ठेवले. राजकारणात केवळ घराणेशाही चालवण्याचा प्रयत्न करणारे आणि अहंकाराच्या शिखरावर बसलेले लोक अखेर बरबाद होतात, हेच या घडामोडींवरून सिद्ध होत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी म्हटले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे