Tuesday, June 30, 2026

FIFA World Cup 2026 : मेस्सी गोलमध्ये अव्वल, पण पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर! 'हा' जर्मन स्टार अव्वल

FIFA World Cup 2026 : मेस्सी गोलमध्ये अव्वल, पण पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर! 'हा' जर्मन स्टार अव्वल

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेने आता बाद फेरीत प्रवेश केला असून प्रत्येक सामना निर्णायक ठरत आहे. अशातच फिफाने प्रथमच जाहीर केलेल्या 'पॉवर रँकिंग' मध्ये मोठा धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असला तरी त्याला अव्वल स्थान मिळालेले नाही. जर्मनीचा स्ट्रायकर डेनिझ उंदाव या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे, तर मेस्सी दुसऱ्या, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे तिसऱ्या आणि ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत थेट ७९ व्या स्थानावर घसरला आहे. (FIFA World Cup 2026)

मेस्सीचे गोल सर्वाधिक, तरीही नंबर-२ :

विश्वचषक २०२६ च्या साखळी फेरीत लिओनेल मेस्सीने तीन सामन्यांत तब्बल ६ गोल झळकावले आहेत. त्याच्या विश्वचषकातील एकूण गोलांची संख्या आता १९ झाली असून पुरुष विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वोच्च विक्रम ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत मेस्सीने किलियन एम्बाप्पे, विनिसियस ज्युनियर आणि एर्लिंग हालांड यांच्यापेक्षाही अधिक गोल केले आहेत. मात्र, फिफाच्या नव्या पॉवर रँकिंगमध्ये मेस्सीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. (FIFA World Cup 2026)

डेनिझ उंदाव ठरला नंबर-१

फिफाच्या आकडेवारीनुसार जर्मनीचा स्ट्रायकर डेनिझ उंदाव हा सध्या विश्वचषकातील सर्वाधिक प्रभावी खेळाडू ठरला आहे. आक्रमण, सर्जनशीलता आणि बचाव या तीन निकषांवर आधारित गुणांकनात त्याने सर्वाधिक गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. (FIFA World Cup 2026)

फिफा पॉवर रँकिंग (टॉप-५) :

१. डेनिझ उंदाव (जर्मनी) २. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) ३. किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) ४. विनिसियस ज्युनियर (ब्राझील) ७९. क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) (FIFA World Cup 2026)

काय आहे FIFA Power Rankings?

फिफाने यंदा प्रथमच खेळाडूंच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यासाठी 'पॉवर रँकिंग' प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीत प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना आक्रमण (Attacking), सर्जनशीलता (Creativity) आणि बचाव (Defending) या तीन विभागांमध्ये ० ते १० गुण दिले जातात. गोलरक्षकांसाठी चेंडूवरील नियंत्रण आणि गोलरक्षण या निकषांवर गुणांकन केले जाते. या गुणांच्या आधारे स्पर्धेतील एकूण कामगिरीचा क्रमवारीत समावेश केला जातो. (FIFA World Cup 2026)

याझिदी समाजाचा हिरो ठरला उंदाव :

२९ वर्षीय डेनिझ उंदाव हा या विश्वचषकातील सर्वात मोठा 'डार्क हॉर्स' मानला जात आहे. जर्मनीकडून खेळणारा उंदाव हा याझिदी आणि कुर्द वंशाचा असून त्याचे आई-वडील निर्वासित म्हणून जर्मनीत स्थायिक झाले होते. (FIFA World Cup 2026)

सुरुवातीच्या सामन्यांत राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या उंदावने ३ गोल आणि २ असिस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे जगभरातील याझिदी समुदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे. उंदावनेही आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना, "माझ्या कामगिरीमुळे माझ्या समाजातील मुलांना प्रेरणा मिळत असेल, याचा मला अभिमान वाटतो," असे सांगितले. (FIFA World Cup 2026)

विश्वचषकाच्या बाद फेरीत आता सर्वांचे लक्ष मेस्सी, एम्बाप्पे आणि उंदाव यांच्या कामगिरीकडे लागले असून पुढील सामन्यांमध्ये ही क्रमवारी बदलते का, याची उत्सुकता फुटबॉलप्रेमींना लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा