Tuesday, June 30, 2026

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सक्रीय होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ या कालावधीत शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या कालावधीत शहर विभागात ४१.०३ मिमी, पूर्व उपनगरात ५३.२७ मिमी, तर पश्चिम उपनगरात ५४.०६ मिमी पावसाची नोंद झाली, तर मुलुंडसह काही भागांमध्ये सकाळी पाणी साचण्याचे प्रकार घडले, तर सायंकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यानंतर अंधेरी सबवेसह(Andheri Subway) काही भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर या सर्व भागांमधील पाण्याचा निचरा झाल्यानंतर परिसरातील वाहतूक सुरळीत झाली होती.

रात्रीपासून सकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईतील शहर भागात ३०.३७ मि.मी, पूर्व उपनगरात ३३.९८ मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ३१.६१ मि.मी एवढा पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर दिवसर संततधार सुरुच होती अणि त्यानंतर सायंकाळी ६ ते ७ या एका तासात शहर विभागात सायन येथील प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळेत २६ मिमी, बी. नाडकर्णी पार्क महानगरपालिका शाळेत २१ मिमी, तर दादर येथील एसडब्ल्यूडी कार्यशाळा, जी/दक्षिण आणि एफ/दक्षिण विभाग कार्यालय परिसरात प्रत्येकी १७ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे सर्वाधिक २९ मिमी पाऊस झाला. त्यानंतर एम/पूर्व विभाग कार्यालयात २७ मिमी, मुलुंड अग्निशमन केंद्रात २५ मिमी, एम/पश्चिम व टी विभाग कार्यालयात प्रत्येकी २४ मिमी, गावणपाडा अग्निशमन केंद्र आणि कलेक्टर्स कॉलनी महानगरपालिका शाळेत २३ मिमी, महाराष्ट्र नगर व शिवाजीनगर महानगरपालिका शाळांमध्ये २० मिमी, पासपोली पवई महानगरपालिका शाळा व एस विभाग कार्यालयात १९ मिमी, तर नूतन विद्या मंदिर येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात कूपर रुग्णालय आणि मरोळ अग्निशमन केंद्र येथे प्रत्येकी २४ मिमी पाऊस झाला. विलेपार्ले(Ville Prale) अग्निशमन केंद्र व मालपा डोंगरी महानगरपालिका शाळेत २३ मिमी, अंधेरी अग्निशमन केंद्र व सुपारी टँक महानगरपालिका शाळेत २२ मिमी, मालवणी अग्निशमन केंद्र व पी/पूर्व विभाग कार्यालयात २१ मिमी, तर बनाना लीफ परिसर, जुहू(Juhu) दवाखाना आणि दिंडोशी(Dindoshi) वसाहत महानगरपालिका शाळेत २० मिमी तसेच दहिसर अग्निशमन केंद्रात १९ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान सायंकाळी अंधेरी सब वेमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडला होता. परंतु काही मिनिटांतच येथील पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सब वे वाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले होते.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

पडझडीच्या घटना : १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना असून शहर विभागात ६, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

३६ ठिकाणी झाडे/फांद्या पडल्या : शहर विभागात ७, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात २३ अशा एकूण ३६ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या.

८ ठिकाणी भिंती/घरे पडल्याच्या तक्रारी : पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ८ ठिकाणी घराचा किंवा भिंतीचा काही भाग पडल्याच्या घटना

जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस : जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले असून रायगड जिल्ह्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट जारी केले आहे. मुंबईत पाऊस सक्रिय झाला असून सोमवार रात्रीपासून पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी सकाळी काहीसा जोर ओसरला तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या.

मुंबई- ठाणे पावसाचा अलर्ट

१ जुलै : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता २ जुलै : ऑरेंज अलर्ट – काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस ३ जुलै : ऑरेंज अलर्ट – अतिवृष्टीची शक्यता ४ जुलै : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >