पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मान्सूनने अखेर हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर अनेक भागांतील शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.






महिनाभरापासून दडी मारलेल्या मान्सूनने अखेर मराठवाड्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना काहीसा वेग मिळण्याची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत नोंदवला गेला. मात्र बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल विभागाच्या निकषानुसार, २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास संबंधित मंडळात अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. दरम्यान, जालना जिल्ह्यात सर्वाधिक २१.० मिलिमीटर, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर जरंडी गावाजवळील मातीचा पूल पावसामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच पुराच्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली होती. मात्र ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दुचाकीस्वाराचा जीव वाचवला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पावसानंतर ओढे आणि नाल्यांना पूर आला. आडगाव बाजार ते आडगाव फाटा या रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनधारक पुराच्या पाण्यात अडकले होते. परभणी शहरात बुधवारी सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पाथरी, मानवत, जिंतूर, येलदरी, सेलू, बोरी, आसेगाव आणि ताडकळस या भागांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली.



नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, मुखेड, कंधार आणि मुदखेड या भागांत मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. हदगाव येथे तब्बल तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. आता शेतीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने उर्वरित पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरीही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. २४ जूनपर्यंत धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १२.९ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या; मात्र आता पावसाने हजेरी लावल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील चार महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. रामनगर महसूल मंडळात १०९ मिलिमीटर, धनगर पिंपरी येथे ९१ मिलिमीटर, तर जालना शहर आणि पाचनवडगाव येथे प्रत्येकी ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंबड शहरात ५३ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बीड जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. बुधवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित भागांत प्रगती करत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.




सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी अधूनमधून भुरभुर पाऊस पडत आहे. त्यामुळे लवकरच दमदार पावसाला सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असून शेतकऱ्यांमध्ये पेरणीबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, हवामान विभागाने किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केल्याने अनेक भागांतील शेतकऱ्यांनी सध्या पेरणी थांबवली आहे. काही ठिकाणी पावसाची समाधानकारक स्थिती असली तरी अनेक भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकरीही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. २४ जूनच्या पावसानंतर मराठवाड्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून बियाणे व खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढली आहे. शेतकऱ्यांनी कृषी पंपांसाठी दिवसा किमान आठ तास वीजपुरवठ्याची मागणी केली आहे. दिवसा वीज मिळाल्यास शेतीचे नियोजन सुधारेल आणि मराठवाड्यातील शेतीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा दीर्घ प्रवास

राष्ट्रपती भवनातील एका साध्या संवादातून भारतीय राजकारणातील एका असाधारण परिवर्तनाची जाणीव झाली. निकालांच्या

जनसंवाद

न्याय तातडीने मिळावा पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व

असुरक्षित लोकलप्रवास

या जीवनवाहिनीमध्ये वाढत चाललेल्या हिंसक घटनांनी एका वेगळ्याच संकटाची जाणीव करून दिली. प्रवासाचा संघर्ष आता

करार झाला; प्रतीक्षा अंमलबजावणीची

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये अनेकदा आशेचे किरण दिसले; परंतु ते दीर्घकाळ टिकले नाहीत. परस्पर

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. महायुतीचे सर्वस्व पणाला लागलेले

जनसंवाद

राजकीय हताशतेचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख पद सोडण्याची केलेली घोषणा, हा