असुरक्षित लोकलप्रवास

या जीवनवाहिनीमध्ये वाढत चाललेल्या हिंसक घटनांनी एका वेगळ्याच संकटाची जाणीव करून दिली. प्रवासाचा संघर्ष आता प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षेची परीक्षा बनला आहे. मयंक लोहारसारख्या तरुणाच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


मुंबईची लोकल ट्रेन हे केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर ती या शहराची ‘जीवनवाहिनी’ आहे. दररोज लाखो मुंबईकर आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि आयुष्याची धावपळ सुरू ठेवण्यासाठी या लोकलमधून प्रवास करतात. मात्र गर्दी, धावपळ, उशीर, धक्काबुक्की आणि मानसिक ताण यांसोबत आता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.लोकल प्रवास हा केवळ शारीरिक आणि मानसिक परीक्षेचा विषय राहिलेला नाही, तर तो अनेकदा जीवघेणा ठरत आहे. चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची केवळ दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेली हत्या असो किंवा मालाड स्थानकात उभे राहण्यावरून झालेल्या वादात ३३ वर्षीय शिक्षक आलोक सिंग यांचा झालेला निर्घृण खून असो; या घटना समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे आणि हिंसक मानसिकतेचे धक्कादायक चित्र समोर आणतात.अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या घटनांनी मुंबईकरांच्या मनात भीती आणि संताप निर्माण केला आहे. एका साध्या वादाचे रूपांतर थेट हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात कसे होऊ शकते, हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाला पडला आहे. आरोपी धारदार शस्त्र घेऊन लोकलमध्ये फिरत असताना रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणा यांची भूमिका काय होती, याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून समस्येचे निराकरण होणार नाही. लोकलमधील सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. फर्स्ट क्लाससारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डब्यातही घटना घडत असतील, तर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मयंक लोहारच्या कुटुंबीयांची कठोर शिक्षेची मागणी योग्य असून, अशा प्रकरणांत जलद न्याय मिळणे गरजेचे आहे. या घटनांमध्ये सहप्रवाशांची निष्क्रियताही चिंताजनक आहे. ‘बायस्टँडर इफेक्ट’मुळे अनेकदा लोक मदतीसाठी पुढे येत नाहीत. अनेक लोक उपस्थित असताना प्रत्येकाला वाटते की, “कोणी तरी दुसरा पुढे येईल.” परिणामी प्रत्यक्ष मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. यामागे भीती, पोलिसांच्या चौकशीची चिंता, न्यायालयीन प्रक्रिया आणि “आपल्याला काय करायचे?” ही उदासीन मानसिकता कारणीभूत असते. मात्र अशा निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढते आणि समाजातील सुरक्षिततेची भावना कमी होते. मुंबई लोकल ही या शहराची ओळख आहे. ती लाखो लोकांच्या आयुष्याचा आधार आहे. त्यामुळे लोकल प्रवास सुरक्षित करणे ही केवळ रेल्वे प्रशासनाची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. कठोर सुरक्षा व्यवस्था, त्वरित कारवाई, प्रवाशांमध्ये जागरूकता आणि हिंसाचाराविरोधात सामाजिक संवेदनशीलता निर्माण झाली, तरच मुंबईची ही जीवनवाहिनी पुन्हा सुरक्षित वाटू शकेल.





माणसातील संयम हळूहळू कमी होत असून “माझेच बरोबर” ही वृत्ती वाढताना दिसते. छोट्या अपयशांचा, ताणतणावांचा आणि निराशेचा साठा कधी कधी टोकाच्या प्रतिक्रियांना कारणीभूत ठरतो. मुंबईसारख्या महानगरीतल्या गर्दीत असूनही माणूस अनेकदा एकाकी आणि तणावग्रस्त असतो. वाढता ताण, असुरक्षितता आणि भावनिक असंतुलन यामुळे हिंसक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. लोकल ट्रेनमधील हिंसाचार समजून घेताना गर्दीच्या मानसशास्त्राचाही विचार करावा लागतो. गर्दीत जबाबदारीची भावना कमी होणे, कायद्याचा धाक कमी वाटणे आणि गर्दीचा आधार मिळणे यामुळे काही व्यक्ती आक्रमक वर्तन करू शकतात. ट्रेनमधील गटांकडून होणारी दादागिरी, वाद किंवा हिंसाचार हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. गर्दीमध्ये काही व्यक्तींना जबाबदारीची जाणीव कमी होते आणि ते एकट्याने न करणारी कृत्ये समूहाच्या आडून करतात. यामागे माणुसकी संपल्याचा प्रश्न नसून संवेदनशीलता कमी होणे, सहानुभूतीचा अभाव आणि वाढता मानसिक ताण हे घटक आहे. आजची वेगवान जीवनशैली, आर्थिक दबाव, नोकरीची असुरक्षितता आणि वैयक्तिक संघर्ष यामुळे अनेकांच्या मनात राग साचत जातो. लोकलमधील छोटा वाद, धक्काबुक्की हा त्या रागाच्या उद्रेकाचे कारण ठरते. मानसशास्त्रातील “फॉलिंग डाउन” संकल्पनेप्रमाणे सततच्या तणावामुळे व्यक्ती नियंत्रण गमावू शकते. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर समाजातील मानसिक तणाव आणि भावनिक असंतुलनाचे लक्षण म्हणून पाहणे गरजेचे आहे.मुंबई लोकलमधील हिंसक घटना ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे. जर गर्दीत एखादा वाद होत असेल, तर तो 'टॉक-बॅक' यंत्रणेद्वारे शांत करणे किंवा सहप्रवाशांनी एकत्र येऊन विरोध करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्थानकांवरील तपासणी आणि डब्यांमध्ये पोलिसांची गस्त वाढवणे हे तांत्रिक पाऊल गरजेचे आहे. मुंबई लोकलमध्ये घडणारी प्रत्येक हिंसक घटना ही आपल्या समाजाच्या मानसिक आरोग्याची आणि मूल्यांची परीक्षा घेणारी आहे. मयंक लोहारच्या निधनाने जो शोक व्यक्त केला जात आहे, तो केवळ एका तरुणासाठी नाही, तर हरवत चाललेल्या 'मुंबईकर' भावनेसाठी आहे. माणुसकीचा अंत झालेला नाही; पण तिचा आवाज या गर्दीच्या गोंधळात हरवत चालला आहे. जर आपण आता जागे झालो नाही, तर अशा घटना आणखी वाढतील. आपण केवळ प्रेक्षक बनून राहिलो, तर आपणही या हिंसेचे अप्रत्यक्ष भागीदार ठरू. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणे आणि दुसऱ्याच्या वेदनेला आपली वेदना समजणे हीच आताची गरज आहे. मयंकला खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल, जेव्हा आपण पुन्हा एकदा सुरक्षित, संवेदनशील आणि संयमी समाज म्हणून उभे राहू. माणुसकी पुन्हा जागृत करण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे.

Comments
Add Comment

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा दीर्घ प्रवास

राष्ट्रपती भवनातील एका साध्या संवादातून भारतीय राजकारणातील एका असाधारण परिवर्तनाची जाणीव झाली. निकालांच्या

पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मान्सूनने अखेर हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची

जनसंवाद

न्याय तातडीने मिळावा पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व

करार झाला; प्रतीक्षा अंमलबजावणीची

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये अनेकदा आशेचे किरण दिसले; परंतु ते दीर्घकाळ टिकले नाहीत. परस्पर

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. महायुतीचे सर्वस्व पणाला लागलेले

जनसंवाद

राजकीय हताशतेचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख पद सोडण्याची केलेली घोषणा, हा