नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा दीर्घ प्रवास

राष्ट्रपती भवनातील एका साध्या संवादातून भारतीय राजकारणातील एका असाधारण परिवर्तनाची जाणीव झाली. निकालांच्या आकड्यांपलीकडे जाऊन २०१४ चा जनादेश एका व्यक्तीच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचा होता. तो क्षण भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरला.





भारतातील सर्वाधिक काळ सेवेत असलेल्या पंतप्रधानांबद्दल वादविवाद सुरू असताना, मला माझे वडील दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील अभूतपूर्व विजयाबद्दल सांगितलेली गोष्ट आठवते आहे. बाबा तेव्हा भारताचे १३वे राष्ट्रपती होते. ते दोघे अगदी विभिन्न राजकीय विचारसरणी असलेल्या पक्षांचे असले तरी त्यांच्यामधील गाढ स्नेह हे कदाचित खऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य होते.निवडणुका झाल्यानंतर जेव्हा निकाल हाती आले, तेव्हा मोदीजी बाबांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले होते. त्यांचे संभाषण सुरू असताना बाबांनी मोदीजींना निवडणुकीबद्दलच्या त्यांच्या विश्लेषणाबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले की तीन दशकांनंतर एका राजकीय पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले आहे. त्यानंतर बाबांनी त्यांच्या खास प्राध्यापकीय शैलीत विचारले की, "या व्यतिरिक्त काही?" तेव्हा मोदीजी काहीच बोलले नाहीत. मग बाबांनी सांगितले की २०१४ ची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील वेगळी निवडणूक आहे, कारण त्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून एक घोषित नवीन चेहरा होता. भाजपला जनतेने दिलेला प्रचंड कौल केवळ त्यांच्या पक्षासाठी नव्हता, तर तो भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना जनतेने दिलेला थेट कौल होता. इतर निवडणुकांमध्ये जेव्हा पंतप्रधानपदाचा चेहरा एक तर गृहीत धरला जातो किंवा अधिकृतपणे जाहीर केला जात नाही किंवा मग परंपरेनुसार नव्याने निवडून आलेल्या खासदारांकडून निवडला जातो किंवा आघाडीतील संख्याबळाने ठरवला जातो, त्याउलट ही प्रक्रिया निवडणुकीनंतर केली जाते. मोदीजींच्या आधीचे पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग जे कधीच जनतेचे नेते नव्हते, त्यांना काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवडले होते. भारताचे आधीचे दोन पंतप्रधान - पी. व्ही. नरसिंह राव आणि देवेगौडा हे पंतप्रधान झाले तेव्हा तर ते संसदेचे सदस्य देखील नव्हते. सोप्या भाषेत सांगायचे, तर वरिष्ठ राजकारण्यांनी पंतप्रधानांची निवड केली होती.




२०१४ हे वर्ष भारतीय राजकारणातील निवडणूक समीकरणांमध्ये एक भूकंपीय बदल घडवून आणणारे ठरले. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून स्पष्ट, ठाम आणि निर्विवादपणे निवड केली. ही निवडणूक जणू काही संसदीय पद्धतीऐवजी थेट राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीप्रमाणेच लढवली आणि जिंकली गेली, अशी तिची छाप होती. २०१४ पूर्वी नरेंद्र मोदीजी हे राष्ट्रीय राजकारणात नवीन होते, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घ कार्यकाळात त्यांनी स्वतःची एक प्रभावी प्रतिमा निर्माण केली होती आणि आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. मात्र, २०१४ ही त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. एखादा व्यक्ती प्रथमच खासदार म्हणून निवडून येऊन, आयुष्यात पहिल्यांदाच संसद भवनात प्रवेश करतानाच भारताचा पंतप्रधान म्हणून प्रवेश करतो, अशी घटना भारतीय संसदीय इतिहासात अभूतपूर्व मानली जाते. जुन्या संसद भवनाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन त्यांनी केलेला प्रणाम हा एक अत्यंत भावनिक आणि प्रतीकात्मक क्षण होता. त्यांच्या त्या कृतीतून लोकशाही संस्थांबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली, आणि त्या भावनिक हावभावाने लाखो भारतीयांच्या हृदयाला स्पर्श केला.





निवडणूक जिंकण्यामागे कधीही एकच एक कारण नसते; तर अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून घडणारी ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. भाजपची भक्कम संघटनात्मक रचना, विविध जाती व सामाजिक समुदायांसोबत सातत्याने जोडलेले राहणे, चुकांची तत्काळ दखल आणि त्यात तातडीने सुधारणा करण्याची तयारी हे असे काही घटक आहेत जे आजच्या भाजपला निवडणुकीत विजय मिळवणारी प्रचंड मोठी शक्ती बनवतात, जी अजेय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे भाजपचे सर्वात प्रभावी बलस्थान आहे, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काँग्रेसमधील वंशपरंपरागत राजकारण आणि प्रादेशिक पक्षांवरील एखाद्या कुटुंबाची एकहाती पकड, यांसारख्या कोणत्याही गोष्टींचा आधार नसताना, केवळ स्वतःची गुणवत्ता आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर सामान्य कार्यकर्त्यापासून देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेला एक खंबीर नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. एका अर्थाने नरेंद्र मोदी आणि भाजप हे समानार्थी शब्द बनले आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात माझ्या मित्रमैत्रिणींशी झालेल्या संभाषणाबाबत सांगते. माझे स्वतःचे नातलग अजूनही कट्टर काँग्रेस समर्थक आहेत आणि बंगालमध्ये काँग्रेसला मिळालेल्या केवळ २.९ टक्के मतांच्या वाट्यात त्यांचा वाटा होता; परंतु माझे बहुतांश मित्र आणि परिचित यांनी भाजपला मतदान केले. निवडणुकीपूर्वी मी त्यांना विचारायचे, ते कोणत्या पक्षाला मत देणार आहेत? बहुतांश करून उत्तर मिळायचे, आम्ही मोदींना मत देणार आहोत. मी त्यांना आठवण करून देत असे की, ही विधानसभा निवडणूक आहे आणि मोदीजी काही यात उमेदवार नाहीत. त्यावर नेहमीच ठरावीक उत्तर मिळायचे. ‘ओई एक-ई व्यापार’ म्हणजे दोन्ही एकच आहे.







नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधानच नाहीत, तर स्वातंत्र्यानंतर देशाला लाभलेल्या सर्वात प्रभावी आणि कणखर नेत्यांपैकी एक आहेत. सत्तेत टिकून राहण्यासाठी सहयोगी पक्षांवर अवलंबून असलेल्या आघाडी सरकारांमध्ये अनेकदा दिसून येणाऱ्या दबावतंत्रांच्या राजकारणाला बळी न पडता त्यांनी देशाला एक मजबूत आणि स्थिर सरकार दिले आहे. त्यांच्या अनेक धोरणांशी किंवा कार्यपद्धतीशी कदाचित कोणाचे मतभेद असू शकतात आणि लोकशाहीत ते स्वाभाविकही आहे, मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जनसंमोहन, भारतीय मतदारांशी असलेले त्यांचे घट्ट नाते, आकांक्षी भारतासाठी त्यांची प्रेरणा, हे नाकारता येणार नाही. याचे प्रतिबिंब २०१९ आणि पुन्हा २०२४ मध्ये उमटले. तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रेम असो किंवा द्वेष पण 'ब्रँड मोदी'कडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मोठ्या अधिकारांसोबत मोठी जबाबदारीही येते. जनतेने थेट त्यांना दिलेल्या या प्रचंड जनादेशाला ते पूर्णपणे न्याय देतील आणि आपल्या देशाला प्रगतीच्या आणखी उत्तुंग शिखरावर नेतील, अशी एक सामान्य नागरिक म्हणून, माझी प्रार्थना आहे.(शर्मिष्ठा मुखर्जी या स्तंभलेखिका आणि ‘Pranab My Father: A Daughter Remembers’, या पुस्तकाच्या लेखिका आहेत. सध्या त्या 'प्रणब मुखर्जी लीगसी फाउंडेशन'चे कामकाज पाहतात.)
Comments
Add Comment

पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मान्सूनने अखेर हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची

जनसंवाद

न्याय तातडीने मिळावा पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व

असुरक्षित लोकलप्रवास

या जीवनवाहिनीमध्ये वाढत चाललेल्या हिंसक घटनांनी एका वेगळ्याच संकटाची जाणीव करून दिली. प्रवासाचा संघर्ष आता

करार झाला; प्रतीक्षा अंमलबजावणीची

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये अनेकदा आशेचे किरण दिसले; परंतु ते दीर्घकाळ टिकले नाहीत. परस्पर

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. महायुतीचे सर्वस्व पणाला लागलेले

जनसंवाद

राजकीय हताशतेचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख पद सोडण्याची केलेली घोषणा, हा