जनसंवाद

न्याय तातडीने मिळावा




पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी व्यक्त केलेला संताप जनभावनांचे प्रतीक आहे. अशा क्रूर गुन्ह्यांसाठी कठोर आणि तातडीची शिक्षा होणे आवश्यक आहे. न्याय मिळण्यास होणारा विलंब कायद्यावरील विश्वास कमी करतो. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर कठोर निर्णय देऊन पीडितेला न्याय मिळावा, हीच अपेक्षा.- जयवंत नारायण चव्हाण, दापोली




विवाह संस्कार




विवाह हा मुलगा-मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे; परंतु आजकाल तो संस्कार न राहता एक भव्य इव्हेंट बनला आहे. महागडे कपडे, सजावट, फोटोसेशन आणि दिखाऊपणावर भर दिला जातो, तर विवाहविधींकडे दुर्लक्ष होते. विवाहासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पण संस्काराचे मूळ महत्त्व मागे पडते. अलीकडे एका लग्नात वराला मारुती मंदिरात नेण्याच्या परंपरेला आधुनिक स्वरूप देत सजवलेल्या बग्गीतून नेण्यात आले. त्याच्यासोबत अस्वल आणि बाहुल्याच्या वेशातील कलाकार नाचत होते. हे दृश्य पाहून परंपरा आणि संस्कारांचे गांभीर्य हरवत चालल्याची खंत वाटली. जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात करताना त्यांचे महत्त्व जपणे आवश्यक आहे. अन्यथा सांस्कृतिक मूल्यांपासून दूर जात आहोत, ही चिंतेची बाब आहे.- लीना गाडगीळ, न्यू पनवेल




लग्नपत्रिकेवर जन्मतारीख




बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव स्वागतार्ह उद्देशाने मांडला असला, तरी त्यातून नागरिकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या डिजिटल युगात लग्नपत्रिका व्हॉट्सॲप, फेसबुक आदी माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असतात. अशा वेळी वधू-वरांची पूर्ण नावे, पत्ता आणि जन्मतारीख यांसारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्यास 'आयडेंटिटी थेफ्ट' व आर्थिक फसवणुकीचा धोका वाढू शकतो.त्याऐवजी वधू-वरांच्या वयाची आधारशी संलग्न सरकारी पोर्टलद्वारे डिजिटल पडताळणी बंधनकारक करावी. बालविवाह रोखण्याबरोबरच नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होईल, याची काळजी प्रस्तावित कायद्यात घेतली जावी, एवढीच अपेक्षा. – प्रदीप मोरे, अंधेरी





उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेचा अपमान




नुकताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बंगळूरुजवळील एका कार्यक्रमात स्वागतासाठी अर्पण केलेल्या माळेतील सफरचंद त्यांनी अर्धवट खाल्ल्यानंतर लोकांच्या दिशेने फेकल्याचे दिसते. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार जनतेचा अपमान मानला जात आहे. जनतेच्या सन्मानाविषयी वारंवार भूमिका मांडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेकडे लक्ष देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.- मनोहर विश्वासराव, शिवडी.





हिंसक प्रवृत्ती चिंताजनक




मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका युवकाची चाकूने हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वीही अशाच कारणांमुळे मुंबईत निष्पाप व्यक्तींचे बळी गेले आहेत. अलीकडेच लग्न ठरलेल्या तरुणाचा लोहगडावरून कडेलोट करून खून करण्यात आल्याची घटनाही समाजातील वाढत्या क्रौर्याचे उदाहरण आहे. क्षुल्लक कारणांवरून जीव घेण्याच्या घटना सातत्याने घडत असून त्यामागे वाढती असहिष्णुता, व्यसनाधीनता आणि सामाजिक मूल्यांची घसरण दिसून येते. प्रेम, नातेसंबंध आणि मानवी संवेदना यांचे विकृत रूप अनेकदा हिंसक घटनांमध्ये दिसून येत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे अशा प्रसंगी उपस्थित असलेली बघ्यांची गर्दी अनेकदा निष्क्रिय राहते. कायद्याचा धाक आणि शिक्षेची भीती कमी होत चालल्याने अशा घटनांना आळा बसत नाही. - अनंत बोरसे, शहापूर, जि. ठाणे




मुंबई आणि बॅनरबाजी


मुंबईत बॅनरबाजी ही नवीन गोष्ट नाही. वाढदिवस, स्वागत, उद्घाटन, वर्धापन दिन, पक्षप्रवेश किंवा विविध राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरभर मोठमोठे बॅनर लावले जातात. अनेकदा या बॅनर्सवर संबंधित व्यक्तींसोबत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तींची छायाचित्रेही छापली जातात. मात्र हे बॅनर वेळेवर काढले जात नसल्याने ते फाटतात, दुमडतात किंवा वाऱ्याने उलटे-सुलटे होतात. त्यामुळे त्या महान व्यक्तींच्या प्रतिमेचा अनादर होतो. ज्यांना बॅनरबाजी करायची आहे त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांचे फोटो वापरावेत; परंतु महान आणि सन्माननीय व्यक्तींची छायाचित्रे अशा प्रकारे वापरून त्यांच्या प्रतिमेचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.- मयूर ढोलम, जोगेश्वरी


ग्रुपबाजीमुळे लोकलमधील गुन्हेगारी वाढतेय


मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय मयंकचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकलमध्ये वाढणारी गुन्हेगारी, गटबाजी, जागा अडवणे आणि किरकोळ कारणांवरून होणारी अरेरावी यावर वेळीच नियंत्रण आवश्यक आहे. लोकल ही सर्वांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, कोणाची खासगी मालमत्ता नाही. रेल्वे पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.- नितीन प्रकाश पडते, ठाणे (प.)

Comments
Add Comment

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा दीर्घ प्रवास

राष्ट्रपती भवनातील एका साध्या संवादातून भारतीय राजकारणातील एका असाधारण परिवर्तनाची जाणीव झाली. निकालांच्या

पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा

प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मान्सूनने अखेर हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची

असुरक्षित लोकलप्रवास

या जीवनवाहिनीमध्ये वाढत चाललेल्या हिंसक घटनांनी एका वेगळ्याच संकटाची जाणीव करून दिली. प्रवासाचा संघर्ष आता

करार झाला; प्रतीक्षा अंमलबजावणीची

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये अनेकदा आशेचे किरण दिसले; परंतु ते दीर्घकाळ टिकले नाहीत. परस्पर

गोकुळ गीते यांच्या रूपाने शिवसेनेला नाशिकमध्ये आणखी बळ

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. महायुतीचे सर्वस्व पणाला लागलेले

जनसंवाद

राजकीय हताशतेचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख पद सोडण्याची केलेली घोषणा, हा