Wednesday, June 24, 2026

FIFA World Cup 2026 : सहा मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेकसवरून पुन्हा वाद ! खेळाडूंच्या आरोग्याची काळजी की कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय ??

FIFA World Cup 2026 : सहा मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेकसवरून पुन्हा वाद ! खेळाडूंच्या आरोग्याची काळजी की कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय ??

मेक्सिको : फिफा वर्ल्ड कप २०२६ हा वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्ल्ड कप असून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.४८ संघ,१०४ सामने आणि अमेरिका, कॅनडा व मेक्सिको या तीन देशांमध्ये होणारी हा पहिला वर्ल्ड कप आहे. मात्र, मैदानावरील खेळापेक्षा सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती प्रत्येक सामन्यात अनिवार्य करण्यात आलेल्या ६ मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेक्सची. फिफाने यंदा प्रत्येक सामन्यात दोन हायड्रेशन ब्रेक अनिवार्य केले आहेत. पहिला ब्रेक पहिल्या हाफच्या २२ व्या मिनिटाला घेतला जात आहे, तर दुसरा ब्रेक दुसऱ्या हाफच्या ६७ व्या मिनिटाला होत आहे.प्रत्येक ब्रेक तीन मिनिटांचा असल्याने एकूण सहा मिनिटे खेळ थांबला जातो.विशेष म्हणजे, हवामान थंड असो वा सामना इनडोअर स्टेडियममध्ये होत असो, हा नियम सर्व सामन्यांसाठी लागू करण्यात आला आहे.

फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांनी या निर्णयामागे खेळाडूंच्या आरोग्याचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये तीव्र उष्णता असल्याने खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ३९ दिवसांत अनेक सामने खेळणाऱ्या संघांसाठी ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व संघांना समान परिस्थिती मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे,असे इन्फॅन्टिनो यांनी म्हटले. मात्र,या नियमावर अनेक प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अमेरिकेचे प्रशिक्षक मॉरिसिओ पोचेटिनो यांनी सांगितले की, “हे ब्रेक्स खेळाची लय बिघडवतात. अटलांटा स्टेडियममध्ये तापमान फक्त २१ ते २३ अंश सेल्सिअस असताना अशा ब्रेक्सची गरज नव्हती.इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुचेल यांनीही या निर्णयावर टीका करत म्हटले की, ब्रेक्समुळे फुटबॉलची नैसर्गिक ओळख बदलते. सलग चालणारी लढत हेच या खेळाचे सौंदर्य आहे.”

दरम्यान, या हायड्रेशन ब्रेक्समागे आर्थिक कारणे असल्याची चर्चाही जोर धरत आहे. अमेरिकेत विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या Fox Sports साठी हे ब्रेक्स जाहिरातींच्या दृष्टीने मोठी संधी ठरत आहेत. रिपोर्टनुसार, ३० सेकंदांच्या एका जाहिरातीसाठी २ लाख ते ७ लाख डॉलर्सपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यामुळे प्रत्येक सामन्यातील हायड्रेशन ब्रेक्समधून लाखो डॉलर्सची कमाई होण्याची शक्यता आहे.१०४ सामन्यांच्या संपूर्ण स्पर्धेतून केवळ या ब्रेक्समधील जाहिरातींमुळे ५०० ते ६०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी की जाहिरातींचा व्यवसाय? हा प्रश्न आता फुटबॉल विश्वात चर्चेचा विषय बनला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा