Monday, June 22, 2026

BMC : उत्कृष्ट शासकीय प्रकल्प निर्मितीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि देखरेख यांना महत्त्व

BMC : उत्कृष्ट शासकीय प्रकल्प निर्मितीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि देखरेख यांना महत्त्व

लिबर्टी उद्यान महानगरपालिका शालेय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे उद्गार

मुंबई : लिबर्टी उद्यान महानगरपालिका शाळेची नवीन इमारत अवघ्या दोन वर्षांत उभी राहिली असून, त्यासोबतच आधुनिक सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या आहेत. याबद्दल मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. शासकीय प्रकल्पांमध्ये चांगली गुणवत्ता मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यासाठी शासकीय प्रयत्नांमध्ये जनतेनेही सहभाग नोंदवावा आणि कामांवर योग्य ती देखरेख करावी. सर्वांच्या सहकार्याने मुंबई महानगराचा विकास साधला जाईल, असे उद्गार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काढले.

मालाड (पश्चिम) स्थित लिबर्टी उद्यान महानगरपालिका शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी २१ जून २०२६ रोजी दुपारी करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना गोयल बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार अस्लम शेख, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष हैदर अली शेख, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष संगीता शर्मा, स्थानिक नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना, नगरसेवक दीपक तावडे, नगरसेवक संजय कांबळे, नगरसेवक योगेश वर्मा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका योगिता कोळी, नगरसेविका संगीता कोळी, नगरसेविका कमरजहाँ सिद्दिकी, स्वीकृत नगरसेवकवीरेंद्र चौधरी, माजी नगरसेविका जया तिवाना, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त कुंदन वळवी, शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, एक नागरिक म्हणून अशा शासकीय कामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. शासकीय प्रकल्प आणि कामांमधून चांगली गुणवत्ता मिळावी, हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. म्हणूनच लोकसहभागाला शासनामध्ये महत्त्व आहे, असे गोयल यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला उत्तम घडविण्यासाठी सर्वदृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शाळा, रुग्णालय, अग्निशमन केंद्र, रस्ते काँक्रीटीकरण, नदी पुनरुज्जीवन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उत्तर मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. अनधिकृत बांधकामे रोखणे व निष्कासित करणे, तसेच अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील नऊ तलावांचे आणि काही उद्यानांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये सर्वसमावेशक सुविधा असतील. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्क्युबेशन सेंटर उभारणीसाठीही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती श्री. गोयल यांनी दिली. चांगले प्रकल्प आणि योजना सुस्थितीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. स्वच्छ केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा फेकू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले.

मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मागील काही वर्षांत देशात आणि राज्यात विकासाची नवी दृष्टी पाहायला मिळत आहे, जिथे पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये शिक्षणालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचे सर्वात मोठे साधन आहे. लिबर्टी उद्यान महानगरपालिका शाळा म्हणजे केवळ भौतिक विकास नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद मिळावी, ही यामागची प्रेरणा आहे. त्यादृष्टीने या शाळेत सर्व आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच येथे सीबीएसई (CBSE) प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ ही संकल्पना केवळ शहरांसाठी नाही, तर शिक्षणासाठीही तितकीच महत्त्वाची आहे, असे महापौरांनी नमूद केले.

स्थानिक नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून लिबर्टी उद्यान महानगरपालिका शाळेची नवीन इमारत साकारण्यात आली आहे. लोकार्पणानंतर लगेचच येथे नवीन सीबीएसई शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीच्या तुकड्या सुरू होतील. या विभागातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी शाळा आहे. येत्या काळात या शाळेतील सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तिवाना यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, दिनांक १ मार्च २०२४ रोजी या इमारतीचे काम सुरू झाले आणि अवघ्या २४ महिन्यांत म्हणजे एप्रिल २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास आला. सुमारे ३,९३७ चौरस मीटरच्या विस्तीर्ण भूखंडावर ही तळमजला अधिक ६ मजल्यांची (G+6) वास्तू उभारण्यात आली आहे. या नवीन वास्तूमध्ये १,५३० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. ५१ प्रशस्त वर्गखोल्या, २ बालवाडी खोल्या, एक भव्य बहुउद्देशीय सभागृह, अ‍ॅक्टिव्हिटी हॉल, डिजिटल-व्हर्च्युअल क्लासरूम्स, २ अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, २ संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, चित्रकला कक्ष आणि २ आधुनिक लिफ्ट्स यांसह मुला-मुलींसाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार बाजार, काचपाडा, श्री मुथूमार्यम्मन नगर, न्यू लिंक रोड आणि इतर परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >