Sunday, June 21, 2026

Ukraine's attack on Russia : रशियाच्या हृदयावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला! मॉस्कोवर ड्रोनचा वर्षाव, तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मोठे नुकसान

Ukraine's attack on Russia : रशियाच्या हृदयावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला! मॉस्कोवर ड्रोनचा वर्षाव, तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मोठे नुकसान

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवला आहे. या अभूतपूर्व कारवाईमुळे रशियाची राजधानी मॉस्को हादरली असून महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला फटका बसला, अनेक ठिकाणी आगी लागल्या आणि शहराच्या विविध भागांमध्ये ड्रोनचे अवशेष कोसळल्याची माहिती समोर आली आहे. (Ukraine's attack on Russia)

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीच्या दिशेने येणारे किमान १९४ ड्रोन रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले. गेल्या काही महिन्यांतील हल्ल्यांच्या तुलनेत हा आकडा अनेक पटींनी जास्त असल्याने युक्रेनच्या वाढलेल्या ड्रोन क्षमतेची चर्चा सुरू झाली आहे. (Ukraine's attack on Russia)

जवळपास १,००० ड्रोन हल्ल्यांचा दावा :

रशियन संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, मॉस्कोसह देशाच्या विविध भागांवर युक्रेनने मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले. रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने जवळपास १,००० ड्रोन रोखल्याचा दावा करण्यात आला आहे. अझोव्ह समुद्र परिसरातही अनेक ड्रोन अडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात किमान १७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. (Ukraine's attack on Russia)

मॉस्को विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती बंद :

ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमधील सर्व प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली. त्यामुळे हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. (Ukraine's attack on Russia)

तेल शुद्धीकरण प्रकल्प युक्रेनच्या निशाण्यावर :

या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य मॉस्को ऑइल रिफायनरी असल्याचे सांगितले जात आहे. क्रेमलिनपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कापोत्न्या परिसरातील या महत्त्वाच्या प्रकल्पावर युक्रेनने याआधीही हल्ला केला होता. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये तेल प्रकल्पाच्या परिसरातून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत. एका स्फोटामुळे इंधन साठवणूक टाकीचे छप्पर हवेत उडाल्याचेही वृत्त आहे. (Ukraine's attack on Russia)

झेलेन्स्कींचा इशारा :

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना तो "न्याय्य प्रत्युत्तर" असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने कीव्हमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील ऐतिहासिक मठ संकुलाला लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला. "आम्हाला हे युद्ध नको आहे आणि कधीच नव्हते. पण जर युक्रेन आगीत जळत असेल, तर मॉस्कोही सुरक्षित राहणार नाही," असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला. (Ukraine's attack on Russia)

युद्धाच्या नव्या टप्प्याची चिन्हे?

अलीकडच्या आठवड्यांत युक्रेनने रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर लांब पल्ल्याचे हल्ले वाढवले आहेत. या रणनीतीद्वारे रशियावर दबाव आणून युद्ध समाप्तीस भाग पाडण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. मॉस्कोवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला रशिया-युक्रेन युद्धाच्या नव्या आणि अधिक धोकादायक टप्प्याची सुरुवात मानला जात असून, यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ukraine's attack on Russia)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >