कृतघ्नता


मनस्विनी-पूर्णिमा शिंदे


केलेल्या उपकारांची जाण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता! उपकाराची फेड अपकाराने!! उपकार करणाऱ्याकडे बघूनही अनोळखी वागणं. आपल्याविषयी कोणी काही चांगले केले असेल त्याचा विसर पडणे. आपण ज्या झाडावर बसलोय तीच फांदी तोडणे. ज्याच्या ताटात जेवलोय तिथे छेद करणे. ज्याने आपल्याला समानतेची वागणूक दिली, त्याला कमी लेखणे. उपकार कधीच विसरू नये. शब्दांनी माणसं जोडावी. सहकार्याने ती जपावी. खूपदा काय होतं काही माणसं आपल्याला आयुष्यात उपयोगी पडलेल्या माणसांनाच विसरतात. आपल्याला वेळेवर ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांना विसरणे ही कृतघ्नता. त्या विरुद्ध जो कोणी मदतीची,

सहकार्याची भावना ठेवून केलेले उपकार विसरत नाही तो आहे कृतज्ञ.

विश्वासघात... आपण एखाद्यावर जीवापाड विश्वास ठेवतो आणि त्याच माणसाने जर विश्वास तोडला तर मात्र कोणावर विश्वास ठेवण्याची इच्छा राहत नाही. विश्वासघात म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे. शत्रू तरी समोरून वार करतो पण मित्रत्व असून विश्वासघात करणाऱ्या माणसासाठी केसाने गळा कापणे अशी म्हण आहे. खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी एक म्हण आहे. हात देणाऱ्याचे मन तोडायचे नसते. विश्वासघाताने खूप मोठे नुकसान होते. नाती तुटतात, माणूस मनातून उतरतो आणि पुन्हा तो माणूस चुकूनही जवळ करत नाही. इतिहासामध्ये विभिषण मेरी जाफर ही नावं विश्वासघातामुळेच काळी झाली. विश्वासघातकी माणूस तात्पुरता जिंकला तरी आयुष्यभर मात्र तो त्याच्या मनात हरलेला असतो. विश्वास तुटला, त्याला तडा गेला की तो माणूस जगात पुन्हा उभा राहू शकत नाही. आजचा काळ डिजिटल आहे. वेदना दिसत नसल्या तरी जाणवतात. गुगलवर ओलावा नसला तरी सुद्धा संवेदन आहे. दिलेला शब्द पाळला पाहिजे, शब्द फिरवला, तर नक्कीच समजा की तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघातकी माणूस जखम देत असतो. आयुष्यात शंभर शत्रू परवडतील पण विश्वासघातकी एक मित्रही परवडत नाही. विश्वासावरच मैत्री आणि इतर नाती सुद्धा अवलंबून असतात आणि त्या नात्यांवर आपले आयुष्य. म्हणून कोणाचाही विश्वासघात करताना हजारदा विचार करा.

यानंतर आहे सतत तुलना करणे.... सतत तुलना म्हणजे आनंदावर विरजण. आपले स्वतःचे आयुष्य दुसऱ्याच्या मीटरने मोजणे. देवाने प्रत्येकाला वेगळं स्वरूप, स्वभाव, प्रवृत्ती दिली आहे. प्रत्येक फूल वेगवेगळे, त्यांचा सुगंध वेगळा तसे प्रत्येक माणूस प्रत्येकापासून वेगळा असतो, मग आपण कोणत्या शर्यतीमध्ये धावतो, कोणाशी स्पर्धा करतो? स्पर्धा ही स्वतःशीच असायला हवी, इतरांशी कशाला आणि त्या स्पर्धेमुळे आपण खिन्न का व्हायचं, आपले प्रयत्न का कोणी थांबवायचे. सायकल घेतली म्हणून आपण पायी चालायचं थांबवणार का? कोण गाढवावर बसलं म्हणून आपण घोड्यावर बसायचं का? ही आहे तुलना... कोणी घातली सोन्याची सरी म्हणून आपण घ्यायची का दोरी! आपण या तुलनेमुळे आपलं घर, माणसं, स्वास्थ्य, आपलं आयुष्य बिघडतं. तुलना म्हणजे एक प्रकारचा मत्सर. कोण जिंकला? कोण हारला? आता इलेक्शन असतं. परीक्षा असतात किंवा स्पर्धा असतात. हारजीत होणारच. त्यामध्ये तुलना काय कामाची. हल्ली पाहिलं सोशल मीडियावरती आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टीपर्यंत, या तुलनेचे दुष्परिणाम सतत पाहत असतो. तुलना करायची, तर स्वतःशी करा. जिंकायचे व स्वतःला जिंका. स्पर्धा करायची स्वतःशीच करा. शाळेत पहिला नंबर आला नाही, शंभर टक्के मिळाले नाहीत. अमुक एका कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. बस इतकंच आणि यातून पुढे परिणाम उद्भवतात. परिणाम घातक. भांडण, वैर, मारामाऱ्या, आत्महत्या, खच्चीकरण, मानसिक बीमारी, रोगराई सतत वाढतच जाते. तो माणूस संतुष्ट नसतोच कधी. सतत तुलना करणारा माणूस इर्ष्या, नैराश्य आणि असमाधान यांना जन्म घालत असतो. जिथे तुलना सोडली... तिथे आनंद सुरू होतो. म्हणून कधीच कोणाशी तुलना करू नका. वडाच्या झाडाला पिंपळाचे पान लागत नाही आणि गुलाबाच्या झाडाला मोगऱ्याचं फूल येत नाही. इतकंच लक्षात ठेवा. आपल्या कुवती, क्षमता पाहून आव्हाने स्वीकारा. अन्यथा ऋण काढून सण करणे. झेपेलं नाही इतके करणे आणि मग पश्चाताप करणे इतकेच तुलना करणाऱ्यांच्या वाट्यास येते.

वर्चस्व गाजवणे... डॉमिनेटिंग म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी राजा आहे. मला अधिकार आहे. हक्क दिलेला आहे. मला सगळं समजतं, तू छोटा, मी मोठा. पण ही दडपशाही किंवा वर्चस्वाची माणसं कधी सुखी होऊ शकत नाहीत. कारण ती इतरांना समजून घेत नाहीत आणि आपलं म्हणणं खरं करण्याच्या प्रयत्नात सगळं खराब करून टाकतात.मग ती नाती असतील, घर असेल, आयुष्य असेल आणि तो माणूस आयुष्यभर एकटाही पडतो. कारण त्याच्या या स्वभावामुळे लोक भीतीने मनापासून त्याच्याकडे जात नाहीत. घाबरतात.कधी कधी बघा एखादी सासू वर्चस्व गाजवते. कधी नवरा तर कधी सून. अशी नाती आपण पाहतो. त्या वेळेला त्या घराला घरपण राहत नाही. कोणीतरी संयम ठेवायला हवा. समजून घ्यायला हवं. आवाज चढवून, दमदाटी करून दडपशाहीने वागतात. कोणत्याही गोष्टीवर शहाणपणा दाखवून मीच खरा हे व्यक्त होणाऱ्या लोकांपासून शांत लांब पळावसं किंवा राहावंसं वाटतं. वाटतं आपणच संयम बाळगायला हवा. ही माणसं सगळीकडे पाहायला मिळतात. ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये, रस्त्यामध्ये, नात्यांमध्ये, घरामध्ये.पण यांच्यामुळे आपल्या प्रगतीवर निश्चित परिणाम होत असतो. आज आपण वरील दुर्गुण पाहिले. आपल्या आत्मपरीक्षणातून आपण देखील आपल्यामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो.(समाप्त)

Comments
Add Comment

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले

चोराच्या उलट्या बोंबा

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर घटना सांगते. एक अमेरिकन बाई पायऱ्या उतरत होती. पायऱ्या अतिशय

एका भुताची गोष्ट!

कथा-रमेश तांबे एक होतं भूत. त्याला रोज रोज स्मशानात राहायचा खूप कंटाळा आला होता. तो म्हणायचा, काय हे आमचे जीवन. या

योगायोग काय असतो पहा!

स्मृतीपटल-अनिल रा. तोरणे यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा बोलले जाते; परंतु

२०,००,००० पुस्तकांचा संग्राहक-पद्मश्री अंके गौडा

संस्कृती-वसंत भोसले के.अनंतारामू या गुरुवर्याने उपदेश दिला होता की, “आयुष्यात कोणाकडूनही लाच स्वीकारू नका,