Saturday, June 20, 2026

NEET : रविवारी नीट-यूजी फेरपरीक्षा, पेपरफुटी रोखण्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

NEET : रविवारी नीट-यूजी फेरपरीक्षा, पेपरफुटी रोखण्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

पुणे  : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या (एनटीए) वतीने वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची नीट-यूजी फेरपरीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात येणार असून, पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा अभूतपूर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ‘भिंतीवरील घड्याळ’ अनिवार्य करण्यात आले असून प्रश्नपत्रिका वायूदलाच्या मदतीने परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत.

यंदाच्या फेरपरीक्षेसाठी देशभरातील २२ लाख ७९ हजार उमेदवार सहभागी होणार आहेत. परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार असून विद्यार्थ्यांना अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी सायंकाळी ६.२० वाजेपर्यंतचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी सकाळी ११ ते दुपारी १.२० या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असून दुपारी १.३० नंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. बायोमेट्रिक पडताळणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास लेखी हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.

फेरपरीक्षा देशभरातील ५५१ शहरांमध्ये आयोजित करण्यात आली असून निष्पक्ष आणि पारदर्शक देखरेखीसाठी ६ हजार ६६९ स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील परीक्षेदरम्यान ही संख्या सुमारे सहा हजार होती. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) थेट देखरेखीखाली ही फेरपरीक्षा होत असल्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार अथवा संशयास्पद बाब आढळल्यास त्याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी एनटीएने स्वतंत्र ऑनलाइन व्यवस्था सुरू केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (नीट-यूजी) पेपरफुटी प्रकरणानंतर रविवारी होणाऱ्या फेरपरीक्षेचा मार्ग न्यायालयांच्या दोन ताज्या निकालांमुळे मोकळा झाला आहे. फेरपरीक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेत फेरपरीक्षेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. फेरपरीक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-२०२६) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने २१ जून २०२६ रोजी विशेष नियोजन केले आहे. या दिवशी दोन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी लागू असणारे विशेष वेळापत्रक रद्द करून आठवड्याच्या नियमित दिवसांप्रमाणे लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने सर्व मार्गांवर उपनगरीय रेल्वेच्या १,८२० लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः रविवारी १ हजार २०० सेवा चालवल्या जातात. पश्चिम रेल्वेनेही रविवारी लोकल गाड्या आठवड्याच्या दिवसांप्रमाणे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज १ हजार ४१४ उपनगरीय लोकल सेवा धावतात. नीट परीक्षार्थींसाठी अहमदाबाद–मुंबई विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. रेल्वेच्या या विशेष व्यवस्थेमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील तसेच गुजरातमधून येणाऱ्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >