श्रद्धांजली-उत्तरा केळकर
काही माणसं आयुष्यात सहज भेटत नाहीत, वास्तवात त्यांना भेटण्याची इच्छा असते, पण ती फार उशिरा भेटतात. त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग उशिरा येतो, पण मग एका भेटीमध्ये ही माणसं आयुष्यभराचा आनंद देऊन जातात. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्याविषयी असेच म्हणता येते. त्यांच्या अजरामर गायकीला सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांनी उत्कर्षा सुमित यांच्याशी बोलताना वाहिलेली आदरांजली.
जेयष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना भेटण्याचा योग एकदाच आला. मात्र, तो प्रसंग अविस्मरणीय ठरला. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांचा ८५ वा वाढदिवस होता. इतर अनेक मान्यवर तेव्हा तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिल्यांदा मी सुमनताईंना भेटले. माझी आणि त्यांची भेट तेवढीच काही क्षणांची. मी त्यांना म्हणाले, ‘खूप वर्षे तुम्हाला भेटायची इच्छा होती, आज पूर्ण झाली.’ सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मनात एक पोकळी दाटून आली. जणू आपल्या भावविश्वातील एक जीवाभावाची व्यक्ती अचानक निघून गेली. ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ या गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले तेव्हा मन आपल्या बालपणात विहार करून आले. ‘उठा उठा चिऊताई, निंबोणीच्या झाडामागे’ या बालगीतांचे स्वर आजही तितकेच ताजे वाटतात. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, संगीताचे प्रवाह बदलले; पण त्या गाण्याची मोहिनी आजही कायम आहे. हीच तर खऱ्या कलेची ताकद असते. हीच स्वरांची ताकद आहे. एखादं गाणं ऐकलं की वर्षानुवर्षे मागे गेलेल्या आठवणी जाग्या होतात. जुनी माणसं, जुने दिवस, जुने क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहतात. या जादूची ताकद प्रत्येक गायकाकडे नसते. ती काही निवडक कलाकारांनाच लाभलेली असते. सुमनताई अशाच कलाकारांपैकी एक होत्या. त्याचं आपल्यामधून जाणं हे एका वाईट स्वप्नासारखं आहे.
सुमनताईंचा आवाज ऐकताना नेहमी एक विलक्षण शांतता जाणवत असे. आजच्या काळात गाण्यांमध्ये आवाजाची ताकद, उंच पट्टी किंवा तांत्रिक कौशल्य यावर भर दिला जातो. पण सुमनताईंच्या आवाजाची खरी ताकद त्याच्या साधेपणात होती. त्यांच्या सुरांमध्ये कोणताही आक्रस्ताळेपणा नव्हता, कोणतीही दिखाऊ चमक नव्हती. त्यांचा स्वर एखाद्या शांत नदीसारखा वाहत असे. सुमनताई फार मृदू बोलत, त्या कधीच मोठ्या आवाजात बोलल्या नाहीत, ओरडल्या नाहीत. त्या खूप विनम्र आहेत, असं मी ऐकून होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला, त्यांच्याशी बोलले तेव्हा जाणवले की त्यांच्या आवाजात कमालीचा गोडवा होता. त्यांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकत राहावा असाच.
सुमन कल्याणपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्या काळात अनेक दिग्गज गायक-गायिका कार्यरत होत्या. स्पर्धा होती, लोकप्रियतेची चढाओढ होती. तरीही सुमनताईंनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. खरं तर गायिका होणे हे त्यांचे स्वप्न कधीच नव्हते. १९७१ मध्ये एका मुलाखतीमध्ये ढाक्यातील (बांगलादेश) आपल्या साध्यासुध्या बालपणाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या होत्या, की त्यांच्या कुटुंबाला कोणतीही कलेची पार्श्वभूमी नव्हती तसेच चित्रसृष्टीमध्येही कोणाला रस नव्हता. सुमनजींना चित्रकलेची आवड होती. त्यांनी मुंबईत आल्यावर प्रसिद्ध ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये चित्रकलेचे शिक्षणही घेतले होते. पण नियतीने त्यांचा मार्ग वेगळा लिहिला होता. स्वरांच्या राज्यातील एक अष्टपैलू राणी म्हणून त्यांची ओळख निर्माण होणार होती...
सुमनताईंनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. एस. डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, खय्याम, शंकर-जयकिशन यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये ओळखली आणि प्रभावी उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गाण्यांचा भाग होण्याची संधी मिळाली. विशेष उल्लेख करावा लागेल तो मोहम्मद रफी यांच्यासोबतच्या युगुलगीतांचा. रफी आणि सुमन ही जोडी हिंदी चित्रपट संगीतातील सर्वाधिक मधुर जोड्यांपैकी एक मानली जाते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘तुझे प्यार करते हैं, करते रहेंगे’, ‘परबतों के पेड़ों पर’, ‘ठहरिये होश में आ लूँ’ यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या गाण्यांमध्ये रफी यांच्या बहारदार आवाजाला सुमनताईंच्या कोमल स्वरांनी सुंदर साथ दिली होती. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी ‘ना तुम हमें जानो’ हे गाणे विशेष उल्लेखनीय आहे. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे असे लोकांना अनेक वर्षे वाटत राहिले. प्रत्यक्षात त्या गाण्यातील नाजूक भावना, शब्दांमधील विरह आणि सुरांमधील मृदुता सुमनताईंनी आपल्या आवाजातून जिवंत केली होती.
सुमनताईंच्या गाण्यांमध्ये एक निरागस भावविश्व होतं. प्रेमाची हळुवार चाहूल, विरह वेदना, आईची माया, निसर्गातलं सौंदर्य किंवा भक्तीची ओल... अशी कोणतीही भावना त्यांनी तितक्याच सहजतेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. म्हणूनच त्यांची गाणी केवळ ऐकली जात नाहीत, तर अनुभवली जातात. ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘केशवा माधवा’, ‘देव माझा विठू सावळा’ ही भावगीते ऐकताना शास्त्रीय संगीतांवरील त्यांची पकड किती घट्ट होती याची जाणीव होते. म्हणूनच भावगीतांची सम्राज्ञी म्हणून असणारी त्यांची ओळख रास्त वाटते. त्यांनी फक्त भावगीतेच गायली असं नाही, तर हिंदी चित्रपटातील किती तरी गाणी गायली, ‘मुझ से ओ हसीना’, ‘आए ना हमको प्यार जताना’ यासारखी गाणी तसेच ‘बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. तसेच ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर...’, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे...’ ही गाणी आजही प्रेमी युगुलांच्या ओठांवर ऐकायला मिळतील. सर्व प्रकारातील गाणी त्यांनी गायली आणि अजरामरही केली. त्यांच्या जाण्याने आपण या अजरामर गाण्यांची गायिका हरवून बसलो आहोत. त्यांनी गाण्यांमध्ये जीव ओतला आणि ती गाणी अजरामर केली. आजही अनेक दशकांनंतर ही गाणी आपल्या कानांना स्वर्गसुखच देतात.
सुमनताईंच्या आवाजाची तुलना अनेकदा इतर प्रसिद्ध गायिकांशी करण्यात आली. खासकरून लता मंगेशकर यांच्या आवाजाशी त्यांच्या आवाजाची तुलना करण्यात आली; परंतु त्यांनी कधीही त्या तुलनांचा गवगवा केला नाही. त्या शांतपणे आपलं काम करत राहिल्या. कलेवर प्रेम करणाऱ्या कलाकाराचा हा सर्वात मोठा गुण असतो. आज आपण अशा युगात जगतो आहोत जिथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी सतत प्रकाशझोतात राहावं लागतं. सामाजिक माध्यमांवर उपस्थिती ठेवावी लागते. स्वतःची प्रतिमा जपावी लागते; परंतु सुमनताईंनी यापैकी काहीही केलं नाही. त्या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, पण रसिकांच्या मनापासून कधी दूर गेल्या नाहीत. कारण त्यांचं नातं लोकांशी जाहिरातींमधून नव्हे, तर त्यांच्या गाण्यांमधून जोडलेलं होतं. खरं तर कलाकार कधीच मरत नाहीत. त्यांची कला जिवंत राहते. आज सुमनताई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्वरांमधून त्या कायम आपल्यासोबत असतील. एखाद्या शांत संध्याकाळी रेडिओवर त्यांचं गाणं लागेल, एखाद्या जुन्या आठवणीसोबत त्यांचा स्वर मनात घुमेल आणि पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती जाणवेल. सुमनताईंनी आपल्या स्वरांनी लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. कित्येक प्रेमकथा त्यांच्या गाण्यांच्या साथीने फुलल्या असतील. कित्येक विरहाच्या क्षणी त्यांच्या स्वरांनी आधार दिला असेल. कित्येक मातांनी आपल्या मुलांना त्यांच्या गाण्यांच्या सुरांमध्ये मग्न करत झोपवलं असेल. एखाद्या कलाकारासाठी याहून मोठं यश दुसरं कोणतं असू शकतं?
आज त्यांना निरोप देताना मनात दुःख आहे, पण त्याच वेळी कृतज्ञतेची भावनाही आहे. कारण त्यांनी आपल्याला स्वरांचं एक अद्भुत विश्व दिलं. जीवनातील अनेक क्षणांना त्यांनी संगीताची सुंदर किनार दिली. आपल्या भावनांना त्यांनी आवाज दिला. आज स्वरांचा एक चंद्र अस्ताला गेला आहे. पण चंद्र मावळला म्हणून त्याचा प्रकाश संपत नाही. तो आठवणींच्या आकाशात कायम झळकत राहतो. सुमनताईंचे स्वरही असेच कायम आपल्या मनात घुमत राहतील. काळ पुढे सरकेल, नवी गाणी येतील, नवे कलाकार येतील; पण काही आवाज असे असतात जेे काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. सुमन कल्याणपूर यांचा आवाज हा त्यापैकीच एक आहे.
(शब्दांकन : उत्कर्षा सुमित)