Saturday, June 13, 2026

Pune Satara Highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक, चालक गंभीर जखमी

Pune Satara Highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक, चालक गंभीर जखमी

पुणे : पुणे-सातारा (Pune Satara Highway) महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात (Accident) घडून एका ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. महामार्गावर तांत्रिक बिघाडामुळे उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की धडक देणाऱ्या ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एका ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या अंधारात पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाला हा ट्रक वेळेत दिसला नाही. त्यामुळे भरधाव ट्रक थेट उभ्या ट्रकवर आदळला. ट्रक आदळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघातानंतर धडक देणाऱ्या ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दीर्घ प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चालकाचा वेग, निष्काळजीपणा किंवा इतर कोणते कारण होते का याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >