Friday, June 12, 2026

Nashik : नाशिकमध्ये मोठी कारवाई ! 12 खाणपट्टे बंद; महसूल विभागाचा दणका

Nashik : नाशिकमध्ये मोठी कारवाई ! 12 खाणपट्टे बंद; महसूल विभागाचा दणका

Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गालगतच्या (Nashik-Mumbai Highway) सारूळ शिवारात महसूल विभागाने मोठी कारवाई करत तब्बल १२ खाणपट्ट्यांचे परवाने निलंबित केले आहेत. गौण खनिज उत्खननात गंभीर अनियमितता आढळल्यानंतर हा मोठा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आला आहे. सारूळ शिवारातील गौण खनिज उत्खननातील गंभीर अनियमिततेवर महसूल विभागाने मोठी कारवाई करीत १६ पैकी १२ नोंदणीकृत खाणपट्ट्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (Maharashtra Minor Mineral Mining) नियमावलीतील अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार पंकज पवार यांच्या आदेशानुसार १७ एप्रिल रोजी १६ नोंदणीकृत खाणपट्ट्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत १२ खाणपट्ट्यांमध्ये गंभीर त्रुटी उघड झाल्या.

१२ खाणपट्ट्यांमध्ये गंभीर त्रुटी उघड

यामध्ये खाण क्षेत्राचे सीमांकन न करणे, सुरक्षा कुंपण नसणे, अनियंत्रित उत्खनन, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी न करणे, हरित पट्टा आणि वृक्षारोपणाच्या अटींचे उल्लंघन, तसेच उत्खनन आणि वाहतुकीच्या नोंदी अद्ययावत न ठेवणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीऐवजी धोकादायक पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

...तर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार

संबंधित खाणपट्टेधारकांना नोटिसा बजावल्यानंतर मे महिन्यात त्यांच्या परवान्यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान आठ जून रोजी मंडळ अधिकारी राहुल काळे व ग्राममहसूल अधिकारी अरुण फसाळे यांनी बंद करण्यात आलेल्या खाणपट्ट्यांकडे जाणारे रस्ते दगड-माती टाकून बंद केले आहेत. पुढील आदेशापर्यंत येथे उत्खननास बंदी राहणार आहे.

खाणपट्टे बंद करण्यात आल्यानंतर अवैध उत्खनन टाळण्यासाठी महसूल विभागाचे गस्ती पथक नियमित गस्त घालणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मंडळ अधिकारी राहुल काळे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >