Tuesday, June 9, 2026

Nashik : सावधान ! शेअर मार्केट आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिककरांना कोट्यवधींचा गंडा; ५ महिन्यांत २५ कोटींची लूट

Nashik : सावधान ! शेअर मार्केट आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिककरांना कोट्यवधींचा गंडा; ५ महिन्यांत २५ कोटींची लूट

Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्या नाशिककरांना सायबर भामट्यांनी मोठा दणका दिला आहे. चालू वर्षात अवघ्या ५ महिन्यांत (जानेवारी ते मे २०२६) ऑनलाईन शेअर मार्केटच्या नावाखाली नाशिककरांची तब्बल २५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सायबर गुन्हेगारांनी नाशिक शहरात लुटीचा नवा उच्चांक गाठला असून सुशिक्षित नागरिक या जाळ्यात अधिक अडकत आहेत.

पोलिसांची अधिकृत आकडेवारी: गेल्या वर्षाची आणि चालू वर्षाची तुलना

वर्ष २०२५ (१ जानेवारी ते डिसेंबर)

ऑनलाईन शेअर मार्केट फ्रॉड: ३२ गुन्हे | ₹२२ कोटी फसवणूक

डिजिटल अरेस्ट फ्रॉड: १२ गुन्हे | ₹११ कोटी फसवणूक

चालू वर्ष २०२६ (१ जानेवारी ते मे अखेर)

ऑनलाईन शेअर मार्केट फ्रॉड: १५ गुन्हे | ₹२५ कोटी फसवणूक

डिजिटल अरेस्ट फ्रॉड: ५ गुन्हे | ₹२ कोटी फसवणूक

याशिवाय चालू वर्षात 'एपीके' (APK) लिंक, डेटिंग ॲप्स, ऑनलाईन जॉब आणि लोन ॲप्सच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड झाले आहेत.

लुटीचे नवीन मार्ग कोणते ?

सायबर पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना खालील प्रमुख क्लृप्त्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे:

१. घातक 'APK' लिंक्स: महावितरण (MSEB), एमएनजीएल (MNGL - गॅस बिल) किंवा आरटीओ ई-चलन (RTO E-Challan) च्या नावाखाली बनावट 'APK' फाईल्स पाठवून मोबाईल हॅक केले जात आहेत.

२. डिजिटल अरेस्टचा विळखा: सीबीआय, ईडी किंवा क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे तासन् तास घरातच 'डिजिटल अरेस्ट' करून खंडणी उकळली जात आहे.

३. इतर फ्रॉड ॲप्स: ऑनलाईन जॉबचे आमिष, झटपट कर्ज देणारे लोन ॲप्स आणि ऑनलाईन डेटिंग ॲप्सचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन: हा सुरक्षेचा मंत्र पाठ ठेवा!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी नागरिकांना सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा सुरक्षेचा मंत्र दिला आहे:

"थांबा, विचार करा आणि मगच ॲक्शन घ्या" (Stop, Think and then Action) आमिषाला बळी पडू नका: ऑनलाईन शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, क्रिप्टो करन्सी किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमधील जादा परताव्याच्या आणि दुप्पट पैशांच्या लालसेला बळी पडू नका.

व्हिडिओ कॉल्सवर विश्वास ठेवू नका: डिजिटल अरेस्ट संदर्भात कोणताही अनोळखी नंबरवरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

लिंक्सवर 'इन्स्टंट' क्लिक टाळा: एमएनजीएल, ई-चलन किंवा एमएसईबीच्या नावाने आलेल्या कोणत्याही लिंक किंवा एपीके फाईलवर विचार न करता त्वरित क्लिक करू नका.

फसवणूक झाल्यास काय करावे ?

जर दुर्दैवाने तुमची सायबर फसवणूक झालीच, तर तात्काळ खालील पावले उचला.

सायबर पोलिसांची राष्ट्रीय हेल्पलाईन १९३० (1930) वर त्वरित कॉल करा.

cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवा.

लवकरात लवकर जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन रीतसर तक्रार दाखल करा.

Comments
Add Comment