Tuesday, June 9, 2026

Jalgaon Crime : अमली पदार्थांचे व्यसन, मुलीवर अत्याचार, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा ; जळगावात काय घडतंय ?

Jalgaon Crime : अमली पदार्थांचे व्यसन, मुलीवर अत्याचार, आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा ; जळगावात काय घडतंय ?

Jalgaon Crime : जळगाव शहरात अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Ramanandnagar Police Station) दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज रॅकेटच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या गुन्ह्याशी संबंधित संशयितांच्या अवैध मालमत्तांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

संशयिताच्या घरावर रात्री जेसीबी

या प्रकरणातील संशयिताच्या घरावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सोमवारी रात्री महापालिका आणि औद्योगिक वसाहत पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरात धडक कारवाई करत ड्रग्ज रॅकेटमधील संशयित रईस हारून देशमुख याच्या घरासमोरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

औद्योगिक वसाहत पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटशी (Drug racket) संबंधित सहा जणांच्या मालमत्तांची माहिती गोळा करून त्या कायदेशीर आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने (Municipal Corporation's Construction Department) संबंधित ठिकाणांची पाहणी केली असता काही बांधकामे अनधिकृत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

त्यानंतर सोमवारी रात्री महापौर दीपमाला काळे, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा फौजफाटा सुप्रीम कॉलनीत दाखल झाला. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी रईस देशमुख याच्या घरासमोर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली दोन दुकाने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

इतर संशयितांची चौकशी सुरु 

दरम्यान निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित या संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीतून ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी समोर आली आणि शहरात कार्यरत असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवत ३ जून रोजी रात्री कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून रईस हारून देशमुख, तौसिफ आसिफ सय्यद आणि कुणाल उर्फ लकी पाटील यांना अटक केली.

या तिघांकडून मिळालेल्या माहितीनंतर ड्रग्ज पुरवठा आणि वितरणाच्या जाळ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान, या रॅकेटमधील अमजद ऊर्फ बिल्डर शेख आणि इम्रान ऊर्फ इमा भिस्ती हे दोघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

ड्रग्ज रॅकेटमधील अन्य संशयितांच्या मालमत्तांचीही सखोल तपासणी सुरू आहे. संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे आढळल्यास त्यांनाही नोटिसा बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज प्रकरणामुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >