Sunday, June 7, 2026

SAFF Women's Championship 2026 : भारत पुन्हा दक्षिण आशियाचा किंग! भारताचे विक्रमी सहावे जेतेपद

SAFF Women's Championship 2026 : भारत पुन्हा दक्षिण आशियाचा किंग! भारताचे विक्रमी सहावे जेतेपद

नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल संघाने तब्बल सात वर्षांनंतर दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप (SAFF Championship) जिंकत इतिहास रचला आहे. शनिवारी (६ मे) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या बांगलादेशला 3-1 अशा फरकाने नमवत जेतपद आपल्या नावे केले आहे. भारतीय महिलांनी सात वर्षांनंतर जेतेपद जिंकले आहे.अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमण करीत बांगलादेशवर दबाव टाकला. सामन्याच्या 42 व्या मिनिटाला प्यारी जाख्सा हिने गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र पहिल्या हाफच्या एक्स्ट्रा वेळेत रितू पोर्णा हिने गोल करत बांगलादेशला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.यामुळे सामन्यात रंगत वाढली.

दुसऱ्या हाफमध्ये भारताने जोरदार पुनरागमन केले. सनफिदा नोंगरुम हिने शानदार हेडरद्वारे गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. लिंडा कोम सेर्तो हिने ८२ मिनिटात बांगलादेशच्या बचावफळीतील चुकीचा फायदा घेत शानदार गोल नोंदवला. या गोलने भारताचा विजय निश्चित झाला.

संपूर्ण स्पर्धेत भारताचा दबदबा

या स्पर्धेत भारतीय महिला संघाने एकही सामना न गमावता जेतेपद पटकावला आहे. भारताने चारही सामने जिंकले आहेत. यात भारताने तब्बल 18 गोल केले,तर प्रतिस्पर्ध्यांना केवळ एकच गोल करण्याची संधी दिली.सलग तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या बांगलादेशचा प्रवास अंतिम फेरीतच थांबला.या ऐतिहासिक विजयासह भारतीय फुटबॉलमधील अनुभवी खेळाडू डांगमेई ग्रेसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप दिला आहे. डांगमई ग्रेसने भारतासाठी २०१३ साली पदार्पण केले होते. तिने भारतासाठी ९५ सामने खेळत फुटबॉलला निरोप दिला आहे.

पुरस्कारांवरही भारताचे वर्चस्व

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

सर्वाधिक गोल – अवेका सिंह (4 गोल) मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – सनफिदा नोंगरुम सर्वोत्कृष्ट गोलकीपर – पंथोई चानू एलांगबाम फेअर प्ले पुरस्कार – नेपाळ

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या यशामुळे भारतीय महिला फुटबॉलसाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. विक्रमी सहावे SAFF जेतेपद पटकावत भारतीय संघाने पुन्हा एकदा दक्षिण आशियात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा