Friday, June 5, 2026

MP Narayan Rane : बाळ माने ओरिजिनल भाजपचा, निवडणूक लागली की तळ्यात मळ्यात करतो!

MP Narayan Rane : बाळ माने ओरिजिनल भाजपचा, निवडणूक लागली की तळ्यात मळ्यात करतो!

खासदार नारायण राणे; त्याला फार 'सिरियसली' घेऊ नका

मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीतून उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतली. आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा ते करत आहेत. याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विचारले असता, "बाळ माने हा मूळचा (ओरिजनल) भाजपचाच कार्यकर्ता आहे, मात्र निवडणूक आली की त्याचं 'तळ्यात मळ्यात' सुरू असतं. प्रत्येक निवडणुकीत त्याला उभं राहायचं असतं आणि पुढील पाच वर्षांची आपली तरतूद करायची असते," असा खोचक टोला खा. राणे यांनी लगावला.

उबाठा गट आणि महाविकास आघाडीकडून कोणतीही राजकीय साथ न मिळाल्यामुळे नाईलाजाने माघार घ्यावी लागल्याचा दावा बाळ माने यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना राणे म्हणाले, "हा सगळा प्रकार म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' आहेत. बाळ मानेंना राजकीय वर्तुळात कोणीही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. एवढी वर्षे तुम्ही त्यांना पाहत आहात, ते कधीतरी एका पक्षात व्यवस्थित राहिले आहेत का? निवडणूक आली की उमेदवारी अर्ज भरायचा, मग समोरचा उमेदवार पाहून तडजोड करायची आणि अर्ज मागे घ्यायचा, हाच त्यांचा आजवरचा पॅटर्न राहिला आहे. त्यांचा स्वतःचा एक वैयक्तिक पक्ष आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही."

बाळ माने यांनी उबाठा गटाचे नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांचा संदर्भ घेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. राणे यांनी राऊत कंपूवरच निशाणा साधला. "बाळ मानेंवर कोणी विश्वास ठेवण्याची गरज नाहीच, पण विनायक राऊत आणि संजय राऊत हे तरी कधी विश्वासाला पात्र ठरले आहेत का? त्यांनी आजपर्यंत कोणाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे? आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत गोष्ट वेगळी होती, आता हे लोक शब्दाला जागणारे नाहीत," असे राणे म्हणाले. विनायक राऊत हे उबाठा गटात पदे देण्यासाठी पन्नास-पन्नास हजार रुपये घेतात, या माने यांच्या आरोपावर मिश्कील टिप्पणी करताना राणे म्हणाले, "आता त्यांचा बाकीचा सगळा धंदा बंद झाला आहे. त्यामुळे रिटायरमेंट जवळ आल्याने ठाकरे गटाचा आता हा एकच धंदा उरला आहे."

ठाकरेंची ताकद त्यांनीच संपवली

बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपये घेतले, असा गंभीर आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाबाबत बोलताना राणे म्हणाले, "या व्यवहाराबाबत संजय राऊत यांनाच जास्त माहिती असेल, कारण सर्व गोळाबेरीज करणारे लोक त्यांच्याच संपर्कात असतात. नक्की किती कोटींचा व्यवहार झाला हे मला माहीत नाही, पण हेही तितकेच खरे की कोणीही सहज अर्ज मागे घेत नाही. जो समोरचा उमेदवार पाहून फॉर्म भरतो, तो काहीतरी विचार करूनच मागे घेतो." उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बळ कोकणात कमी पडले का? या प्रश्नावर राणेंनी ठाकरेंच्या नेतृत्वावर कडाडून प्रहार केला. "ठाकरेंचे बळ कुठे आहे? त्यांची कोणती ताकद उरली आहे? मीडियानेच त्यांचे बळ उगाच वाढवून सांगितले होते. ठाकरेंची जी काही उरलीसुरली ताकद होती, ती त्यांच्याच लोकांनी आणि त्यांच्याच चुकीच्या निर्णयांनी आता पूर्णपणे संपवून टाकली आहे," असे खासदार नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >