Sunday, May 31, 2026

France : फुटबाँल मॅचनंतर फ्रान्स धगधगला! जल्लोषाचं रूपांतर दंगलीत; ४०० हून अधिक जण अटकेत, पोलीसही जखमी

France : फुटबाँल मॅचनंतर फ्रान्स धगधगला! जल्लोषाचं रूपांतर दंगलीत; ४०० हून अधिक जण अटकेत, पोलीसही जखमी

पॅरिस : फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. मात्र या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी संपूर्ण फ्रान्समध्ये हिंसाचाराचे लोण पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. विजयाच्या जल्लोषादरम्यान हजारो फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले आणि अनेक ठिकाणी पोलिसांशी त्यांची झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत 400 हून अधिक जणांना अटक केली आहे. (France)

चॅम्प्स-एलिजीवर तुफान गोंधळ; वाहनांची जाळपोळ :

पीएसजीच्या विजयानंतर राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध चॅम्प्स-एलिजी परिसरात हजारो चाहते एकत्र जमले. सुरुवातीला फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष सुरू होता. मात्र काही वेळातच या उत्सवाला हिंसक वळण लागले. काही समाजकंटकांनी रस्त्यावरील इलेक्ट्रिक दुचाकींना आग लावली, दुकानांची तोडफोड केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले. (France)

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. या संघर्षात काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (France)

हजारो पोलिस तैनात; वाहतूक सेवांवर परिणाम :

हिंसाचार रोखण्यासाठी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. हजारो पोलिस रस्त्यावर उतरवण्यात आले असून संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दंगल आणि गोंधळामुळे शहरातील बस, ट्रेन आणि रेल्वे सेवांवरही परिणाम झाला. काही मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवावी लागली, तर अनेक नागरिकांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागला. (France)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात किमान सहा वाहने, दोन दुकाने आणि एक बस थांबा पूर्णपणे नष्ट झाला आहे.

मैदानाबाहेरही संघर्षाचे पडसाद :

अंतिम सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी पीएसजीच्या घरच्या मैदानाबाहेरही हजारो चाहते जमले होते. पार्क डेस प्रिन्सेस स्टेडियम परिसरातही काही ठिकाणी चाहत्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीतील काही अतिरेक्यांनी वातावरण बिघडवल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. (France)

सलग दुसऱ्या वर्षी विजयानंतर हिंसाचार :

विशेष म्हणजे, पीएसजीच्या मोठ्या विजयाला सलग दुसऱ्या वर्षी हिंसाचाराची किनार लाभली आहे. गेल्या वर्षी संघाच्या युरोपियन यशानंतरही देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्या वेळी झालेल्या हिंसक घटनांमध्ये एका १७ वर्षीय मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला होता. यंदाही विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी हिंसक घटनांनी फ्रान्सचे लक्ष वेधून घेतले आहे. (France)

फुटबॉल हा उत्साह, एकता आणि खेळभावनेचा उत्सव मानला जातो. मात्र पीएसजीच्या ऐतिहासिक विजयानंतर उसळलेल्या दंगलींमुळे फ्रान्समध्ये पुन्हा एकदा क्रीडा जल्लोष आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (France)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >